शैक्षणिक क्षेत्रात जिल्हा आघाडीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शैक्षणिक क्षेत्रात जिल्हा आघाडीवर
शैक्षणिक क्षेत्रात जिल्हा आघाडीवर

शैक्षणिक क्षेत्रात जिल्हा आघाडीवर

sakal_logo
By

85624
सावंतवाडी ः दीपक केसरकर मित्रमंडळ व अध्यापक संघाच्यावतीने सुषमा मांजरेकर यांचा पारितोषिक देऊन सन्मान करताना वि. ना. लांडगे, अशोक दळवी, भरत गावडे आदी.

शैक्षणिक क्षेत्रात जिल्हा आघाडीवर

वि. ना. लांडगे; सावंतवाडीत अध्यापक संघातर्फे गुणवंतांचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ ः सिंधुदुर्ग जिल्हा नररत्नांची खाण आहे. या भूमीने सर्व क्षेत्रांत नररत्ने दिली आहेत. शैक्षणिकदृष्ट्या सिंधुदुर्ग राज्यात आघाडीवर आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य अध्यापक संघाचे अध्यक्ष वि. ना. लांडगे यांनी केले. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर संयमी व्यक्तिमत्व असून सर्वांना बरोबर घेऊन कार्यरत आहेत. मराठी भाषेला समृद्धी मिळण्यासाठी त्यांचे प्रयत्न गौरवास्पद आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.
दीपक केसरकर मित्रमंडळ व सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघ आयोजित मराठी भाषा दिनानिमित्त मराठी शिक्षक सन्मान व विद्यार्थी गुणगौरव सोहळा येथील काझी शहाबुद्दीन सभागृहात झाला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख माजी सभापती अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, अध्यापक संघाचे कार्यकारी अध्यक्ष भरत गावडे, ज्ञानदीप शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वाय. पी. नाईक, विकास गोवेकर, प्रा. गोविंद काजरेकर, प्रदीप शिंदे, आबा केसरकर, नंदू शिरोडकर, नंदू गावडे आदी उपस्थित होते. प्रारंभी कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्‍घाटन झाले. भरत गावडे यांनी स्वागत केले.
यावेळी श्री. लांडगे म्हणाले, ‘‘समाजासाठी केलेले कार्य प्रेरणादायी ठरते. कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न केला. त्यांनी ज्ञानपीठ पुरस्कार ज्ञानगंगेला अर्पण केला. मराठी अध्यापक संघाच्या वतीने राज्यात दौरा करत असताना शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्य अतुलनीय कार्याची प्रचिती आली. नवीन शैक्षणिक धोरण सर्वांना विश्वासात घेऊन ते आणत आहेत. त्यांचे संयमी व्यक्तिमत्व आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची कार्यपद्धती भूषणावह आहे. सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रांची खाण आहे. कुसुमाग्रजांच्या कविता, साहित्य अभ्यासले पाहिजे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करण्यामागची तपश्चर्या महत्त्वाची आहे. आध्यात्म, भूगोल, इतिहास अशा प्रत्येक क्षेत्रातील माहिती असल्यास आपण चांगले ज्ञानदान करू शकतो. सामाजिक भावनेतून भरत गावडे, सहकारी चांगले काम करत आहेत.’’
प्राचार्य डॉ. काजरेकर, भरत गावडे यांनी मार्गदर्शन केले. गावडे यांनी शिक्षण, मराठी भाषा मंत्री केसरकर मंत्रिपदाला न्याय देत आहेत. मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी त्यांचे प्रयत्न स्तुत्य आहेत, असे सांगितले. यावेळी वि. ना. लांडगे, डॉ. काजरेकर आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य अध्यापक संघाच्या वतीने आयोजित निबंध स्पर्धेत विशाखा पालव (इन्सुली हायस्कूल) प्रा. सुषमा मांजरेकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय क्रमांक पटकावले. त्यांचा गौरव करण्यात आला. विशाखा पालव यांनी सूत्रसंचालन केले.
--
इतर मान्यवरांची मनोगते
शिवसेना जिल्हाप्रमुख दळवी म्हणाले की, मराठी भाषेला चांगले स्थान निर्माण व्हावे, यासाठी शिक्षण व मराठी भाषा मंत्री केसरकर प्रयत्नशील असल्याचे सांगून अध्यापक संघाच्या सत्कार, गुणगौरव सोहळ्यास शुभेच्छा दिल्या. तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांनी समाजात शिक्षण आणि शिक्षकांचे स्थान सर्वोच्च आहे. शिक्षण व मराठी भाषा मंत्री केसरकर यांनी मराठी भाषा सातासमुद्रापार नेण्यासाठी प्रयत्नरत आहेत. मराठी भाषेतून शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत, असे सांगितले.