रत्नागिरी- मराठी लोकभाषा, व्यवहारभाषा होण्यासाठी इच्छाशक्ती हवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- मराठी लोकभाषा, व्यवहारभाषा होण्यासाठी इच्छाशक्ती हवी
रत्नागिरी- मराठी लोकभाषा, व्यवहारभाषा होण्यासाठी इच्छाशक्ती हवी

रत्नागिरी- मराठी लोकभाषा, व्यवहारभाषा होण्यासाठी इच्छाशक्ती हवी

sakal_logo
By

मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी इच्छाशक्ती हवी

अॅड. विलास पाटणे; मराठी विषय सक्तीपेक्षा अस्मितेचा केला पाहिजे

रत्नागिरी, ता. २ ः मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना त्याबाबत विनंती करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. या विधानाचे स्वागत करतो; परंतु मराठी एक लोकभाषा, व्यवहारभाषा आणि ज्ञानभाषा होण्याच्यादृष्टीने प्रयत्न व्हायला राज्यकर्त्यांमध्ये इच्छाशक्ती हवी, असे प्रतिपादन लेखक अॅड. विलास पाटणे यांनी केले.
मराठी विषय सक्तीपेक्षा अस्मितेचा केला पाहिजे. मराठी ही लोकभाषा, व्यवहारभाषा आणि ज्ञानभाषा म्हणून टिकावी यासाठी आतापर्यंत राज्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत, असे त्यांनी ठामपणे सांगितले. याबाबत ते म्हणाले, कन्नड भाषा अभिजात होण्याकरिता संपूर्ण कर्नाटक राज्य बंद होते. मराठी भाषा श्रीमंत होण्याकरिता सर्वांनी मराठीपणाची ज्योत तेवत ठेवली पाहिजे.
मराठी शाळा बंद पडत आहेत. मराठी व्‍यवहार भाषाही उरलेली नाही. अशा स्‍थितीत दुकाने आणि सरकारी कार्यालयातील नावांच्‍या पाट्या मराठीत लावणे बंधनकारक करून मराठी ज्ञानभाषा होणार का? १६ फेब्रुवारी २०२१ ला केवळ मराठी माध्यमात शिक्षण झाले म्हणून २५२ जणांना शिक्षकाच्या नोकरीपासून मुंबई महापालिकेने नाकारले ही वस्तुस्थिती आपण स्वीकारली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. मराठी भाषा रोजच्या व्यवहाराची, शिक्षणाच्या माध्यमाची आणि जगण्याची भाषा बनेल तरच मराठीला प्रतिष्ठा मिळेल.
----
मराठीचा विषय राजकीय
मराठी ज्ञानभाषा करायची असेल तर ती व्‍यवहारात, शिक्षणात आली पाहिजे. अभिजात भाषेचा दर्जा गेली नऊ वर्षे प्रलंबित आहे; परंतु भाषा संवर्धनाचे प्रश्न त्यातून सुटणार नाही. गल्लोगल्ली मराठीचा वापर वाढणार नाही, दर्जेदार साहित्य निर्मिती होणार नाही, मराठी शाळांना चांगले दिवस येणार नाहीत. अभिजात भाषेचा मुद्दा भाषिक, वाङ्मयीन आणि सांस्कृतिक राहिलेला नसून तो केवळ राजकीय बनला आहे; परंतु भाषांना अभिजात दर्जा मिळाला म्हणून त्यांच्या दर्जात काहीच फरक पडला नाही, ही वस्तुस्थिती आहे.
----