
कुडाळ पंचायत समितीचा राज्यात डंका
swt११७.jpg
८६१५४
कुडाळः शोषखड्डा उपक्रमाच्या प्रारंभ प्रसंगी तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, गटविकास अधिकारी विजय चव्हाण आदी.
(छायाचित्र ः अजय सावंत)
कुडाळ पंचायत समितीचा राज्यात डंका
शोषखड्डा मोहिमेत अव्वलः मुंबईत उद्या होणार सन्मान
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १ः संपूर्ण महाराष्ट्रात शोषखड्डा मोहिमेमध्ये कुडाळ पंचायत समिती सर्वोकृष्ट ठरली असून पुन्हा एकदा यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. महाराष्ट्रामध्ये २३,२९१ शोषखड्ड्यांमध्ये एकमेव कुडाळ तालुक्यात ९,३१७ असे सर्वाधिक शोषखड्डे मारण्यात आले. या पुरस्काराचे वितरण शुक्रवारी (ता. ३) मुंबई येथे होणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि विविध विभागांच्या योजनांचे अभिसरण करून सुविधासंपन्न कुटुंब मिशन राबविणे आणि सर्वांगीण ग्रामसमृध्दी योजनेचा प्रारंभ शुक्रवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान यशवंतराव चव्हाण केंद्र, नरिमन पॉईंट, मुंबई येथे होणार आहे.
यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदींसह विविध विभागांच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य वन संरक्षक (सामाजिक वनीकरण), उपजिल्हाधिकारी (रोहयो), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (रोहयो), जिल्हा कृषी अधिकारी व सर्व जिल्हा रेशीम अधिकारी, नरेगा आयुक्तालयातील अनिल किटे (सहायक आयुक्त, पंचायत), प्रशांत डाबरे (सहायक संचालक, लेखा), अभय तिजारे व दिप्ती काळे (मानव विकास संसाधन), नागपूर तसेच राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील उत्कृष्ट काम करणारे १२० गट विकास अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ या तीन वर्षांत ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हास्तरावर वैशिष्ट्यपूर्ण काम केलेल्या अधिकाधिक संस्थांना, सर्वोच्च ग्रामपंचायतींना पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.
कुडाळ पंचायत समितीने कोविड कालावधीत सुद्धा ग्रामपंचायत, तालुका व जिल्हा स्तरावर वैशिष्ट्यपूर्ण काम करताना गेली तीन वर्षे ‘माझं घर माझा शोषखड्डा’ अभियान राबविले. तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या प्रमुख उपस्थितीत या योजनेचा जिल्हा पातळीवरील प्रारंभ पणदूर येथे, तर समारोप नेरुर येथे केला होता. कोविड कालावधीमध्ये नागरिकांच्या हातात पैसा नव्हता. यावेळी कुटुंबाला रोजीरोटी मिळावी म्हणून कुडाळ तालुक्यात ९३१७ शोषखड्डे पूर्ण करून प्रत्येक शोषखड्ड्यामागे एका कुटुंबास २,५५७ रुपये अनुदान मिळाले. राज्यामधील एकूण २३२९१ शोषखड्ड्यांपैकी ९३१७ शोषखड्डे कुडाळ तालुक्याने पूर्ण केले. या वैशिष्ट्यपूर्ण आणि स्तुत्य उपक्रमाची राज्याने दखल घेतली आहे. येथील पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण व सहायक प्रशासन अधिकारी चंद्रशेखर माळकर यांना निमंत्रित केले असून त्यांचा गौरव होणार आहे.
वैशिष्ट्यपूर्ण काम म्हणजे १९५८ शेतकऱ्यांनी फळझाड लागवडीचा लाभ घेतला असून ११६९.८९ हेक्टर एवढी जमीन लागवडीखाली आणली आहे. सामाजिक वनीकरण, विहिरी, गोठे, अंगणवाडी या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा सत्कार होणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या कोकण विभागात कुडाळ पंचायत समितीने बाजी मारली आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. यापूर्वी गटविकास अधिकारी चव्हाण हे देवगड येथे कार्यरत असताना हा तालुका जिल्ह्यात अग्रेसर होता. कोरोना कालावधीत पुरेसा कर्मचारी वर्ग नसताना सुद्धा ही कार्यपद्धती राबविण्यात आली. यामध्ये शेखर माळकर (अधीक्षक), नंदकुमार धामापूरकर, शिल्पा वेंगुर्लेकर, अमित देसाई, मंदार पाटील, विजया जाधव, रुपेश चव्हाण यांचे सहकार्य लाभले.