
महावितरणच्या थकबाकी वसुलीसाठी कर्मचाऱ्यांची धावपळ
rat०२१८.txt
बातमी क्र..१८ (टुडे २ साठी)
महावितरणच्या कर्मचाऱ्यांची वसुलीसाठी धावपळ
खेड, लोटे विभाग ः मोबाईलद्वारे मेसेज पाठवून नोटीस, ११ हजार थकबाकीदार
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २ ः महावितरणच्या खेड व लोटे विभागातील ११ हजार ५७८ ग्राहकांकडे वीजबिलापोटी कोट्यवधी रुपयांची रक्कम थकीत आहे. ही थकबाकी वसुलीसाठी कर्मचारी व अधिकारी यांचे फिरते पथक सक्रिय झाले आहे. सणासुदीच्या तोंडावर आल्यामुळे दोन्ही विभागातील काही ग्राहकांकडून वसुली थकण्याची शक्यता आहे.
महावितरण कंपनीच्या खेड विभाग कार्यक्षेत्रांतर्गत ६ हजार ८२८ ग्राहकांची फेब्रुवारी महिन्याअखेरपर्यंत १ कोटी ७३ लाख ३८ हजार इतकी वीजबिल थकबाकी आहे. यामध्ये ५६५२ घरगुती ग्राहकांची ३९ लाख २२ हजार इतकी थकबाकी आहे. ७११ व्यापाऱ्यांची १५ लाख ९७ हजार, ३५ औद्योगिक कंपन्यांची ८ लाख ३७ हजार, १११ शेतकऱ्यांची १ लाख ४६ हजार, ९७ दिवाबत्तीची ८६ लाख २६ हजार, ५९ पाणीपुरवठा योजनेची १२ लाख ५४ हजार, १६३ शासकीय व निमशासकीय कार्यालयांची ९ लाख ५७ हजारांची देयके बाकी आहेत. त्याचबरोबर लोटे विभाग कार्यक्षेत्रांतील ४७५० ग्राहकांची १ कोटी ६७ लाख ४२ हजार इतकी वीजबिलाची थकबाकी आहे. यामध्ये ४०७४ घरगुतीची २७ लाख ८ हजार, २३९ व्यापाऱ्यांची ६ लाख ६४ हजार, ४४ औद्योगिक कंपन्यांची ५ लाख २ हजार, १२५ शेतकऱ्यांची १ लाख ६२ हजार, ९३ दिवाबत्तीची १ कोटी २२ लाख १९ हजार, ४३ पाणीपुरवठा योजनेची २ लाख ३७ हजार, १३२ शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयांची २ लाख ५० हजाराची देयके बाकी आहेत. आर्थिक वर्षातील शेवटचा मार्च महीना सुरू झाला आहे. या महिन्यात ग्राहकांकडून जुनी व नवीन वीजबिल वसुलीसाठी येथील महावितरण कंपनीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची फिरती पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकातील कर्मचाऱ्यांकडून तसेच मोबाईलद्वारे मॅसेज पाठवून नोटीस बजावण्यात येत आहेत. निवासी, शेतीपंप, पथदीप, शासकीय व निमशासकीय ग्राहकांना वीजबिल भरणा करण्याचे आवाहनही करण्यात येत असून बिल भरणा न केल्यास वीज जोडणी तोडण्याचे संकेत दिले आहेत. महावितरण कंपनीच्या वसुली पथकांनी थकित वीजबिलांच्या वसुलीसाठी मोहीम अधिक तीव्र केली आहे.
सणांच्या तोंडावर वसुली
तीन दिवसांपूर्वीच फाक पंचमीला सुरवात होऊन मार्चमध्ये सणांच्या तोंडावर दोन्ही विभागातील काही ग्राहकांकडून वीजबिल भरणा थकण्याची शक्यता आहे. ग्राहकांकडून थकलेली रक्कम वसूल करण्यासाठी कर्मचारी वीजपुरवठा तोडून ''दंड'' लावण्याचा मार्गदेखील अवलंबणार असल्याने मार्च अखेरपर्यंत वसुली शंभर टक्के करण्यासाठी कर्मचारी व अधिकारी यांना स्वतःची ऊर्जा चांगलीच पणाला लावावी लागणार आहे.