
समुद्रात बोट पेटवली
86517
निवती (वेंगुर्ले) ः येथे बुधवारी मध्यरात्री भर समुद्रात अज्ञातांनी पेटवून दिलेली बोट गुरुवारी किनाऱ्यावर आणण्यात आली.
समुद्रात बोट पेटवली
निवतीत प्रकार; ४५ लाखांचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २ ः तालुक्यातील निवती समुद्रामध्ये नांगरून ठेवलेल्या प्रसिद्ध मच्छी व्यावसायिक श्याम चंद्रकांत सारंग यांच्या ‘चांदणी’ या मिनी पर्सनेट बोट अज्ञातांनी बुधवारी (ता.१) मध्यरात्री पेटवून दिली. बोटीवर असलेल्या तीन इंजिन व जाळ्यांनी पेट घेतल्याने समुद्रातच आगीचा भडका उडाला. यात तिन्ही इंजिन, जाळी, टीव्ही, कॅमेरा, फिश फाईंडर व लाईट सिस्टीमसह बोटीचे सुमारे ४५ लाखांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे निवती-श्रीरामवाडी भागात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी ः बुधवारी (ता.१) रात्री खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांना निवती समुद्रात बोटीला आग लागल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्यांनी मोबाईलवरून किनारपट्टीवर घटनेची माहिती दिली. यावेळी तत्काळ स्थानिक मच्छीमार जमा झाले व अन्य बोटींच्या साहाय्याने समुद्रात गेले. तेथे गेले असता सारंग यांच्या मालकीची बोट जळत असल्याचे लक्षात आले. वारा असल्याने बोट जळत जळत ७ ते ८ वाव समुद्रात गेली होती. मच्छीमारांनी पाणी मारून आग नियंत्रणात आणली; मात्र तोपर्यंत बोटीचा जास्तीत जास्त भाग व आतमधील जाळी, इंजिन व इतर साहित्य जळून खाक झाले होते. यानंतर जळीतग्रस्त बोट इतर बोटींच्या साहाय्याने किनाऱ्यावर आणण्यात आली. दरम्यान, निवती ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये आग मध्यरात्री एक वाजून आठ मिनिटांनी लावल्याचे दिसून आले आहे; मात्र कॅमेऱ्यात कोणीही कैद झाले नसल्याची माहिती निवती पोलिसांनी दिली आहे. निवती पोलिसांनी पंचनामा करून अज्ञातांवर गुन्हा दाखल केला.
---------------