
भात विक्रीतून शेतकऱ्यांना मिळाले 57 लाख 65 हजार
भात विक्रीतून शेतकऱ्यांना
मिळाले ५७ लाख ६५ हजार
राजापूर खरेदी-विक्री संघ ; दरवाढीने दिलासा
राजापूर, ता. ३ ः लावणीच्यावेळी पावसाने मारलेली दांडी आणि कापणीच्यावेळी पडलेला अवकाळी पाऊस, किडींचा प्रादुर्भाव आदींमुळे भातशेतीच्या झालेल्या नुकसानीने यावर्षीही शेतकर्यांचे कंबरडे मोडले. सावरलेल्या शेतकर्यांना भातखरेदीच्या शासकीय दरामध्ये यावर्षी झालेल्या वाढीने हात दिला होता. त्याचा फायदा उचलत तालुक्यातील शेतकर्यांनी खरेदी-विक्री संघाकडे यावर्षी तब्बल २ हजार ८३६ क्विंटल भातविक्री केली आहे. भात विक्रीतून यावर्षी ५७ लाख ८५ हजार ४४० रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती राजापूर खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक दीपक कानविंदे यांनी दिली. भातविक्री मोबदल्याची बहुतांश ९५ टक्केहून अधिक रक्कम शेतकर्यांच्या बँकखात्यामध्ये जमा झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावर्षी आधी अतिवृष्टी आणि त्यानंतर अवकाळी पाऊस, त्यामध्ये आलेला नद्यांना पूर यामुळे भातशेतीचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकर्यांचे कंबरडे मोडून गेले. या स्थितीमध्ये भातखरेदीच्या दरामध्ये झालेली वाढ शेतकर्यांना दिलासा देणारी आहे. याचा फायदा उचलत अनेक शेतकर्यांनी खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून भातविक्री केली. तालुक्यामध्ये राजापूर खरेदी-विक्री संघाच्या पाचल आणि राजापूर येथील केंद्रावर भातखरेदी करण्यात आली. त्यामध्ये राजापूर येथे ४२ शेतकर्यांकडून १२६५.६० क्विंटल तर पाचल येथे ६७ शेतकर्यांकडून १५७०.४० क्विंटल असे मिळून २ हजार ८३६ क्विंटल भाताचा समावेश आहे. भातखरेदीच्या उपक्रमामध्ये संघाचे अध्यक्ष चंद्रकांत जड्यार, उपाध्यक्ष सूर्यकांत सिनकर यांच्यासह संचालक मंडळाचे मार्गदर्शन आणि सहकार्यही महत्वपूर्ण ठरल्याचे कानविंदे यांनी स्पष्ट कले. भातविक्रीच्या माध्यमातून यावर्षी झालेली लक्षवेधी उलाढाल निश्चितच भातशेतीला सकारात्मक प्रोत्साहन देणारी ठरली आहे.
------------
चौकट
दृष्टिक्षेपात भातखरेदी
केंद्र शेतकरी संख्या भातखरेदी (क्विंटल) रक्कम
राजापूर ४२ १२६५.६० २५,८१,८२४
पाचल ६७ १५७०.४० ३२,०३,६१६
------------------------------------------------
एकूण १०९ २८३६ ५७,८५,४४०