
खावडी-साटवली रस्त्याची दुरवस्था
खावडी-साटवली रस्त्याची दुरवस्था
लांजा, ता. ३ः गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने मागणी होत असलेल्या लांजा तालुक्यातील खावडी पिलकेवाडी खरावते विहीर ते साटवली मार्गाला जोडणाऱ्या २.५ किमी अपूर्ण रस्त्याचे खडीकरण करण्यात यावे. तसेच साईडपट्ट्यांचे काम करण्यात यावे, अशी मागणी खावडी येथील पिलकेवाडी सेवा संघाच्या वतीने केली आहे.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदन दिले आहे. पिलकेवाडीतील खरावते विहीर ते साटवली मार्गाला जोडणाऱ्या २.५ किमी रस्त्याचे खडीकरण झाले नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. वाडीतून मुख्य साटवली रस्त्याला हा रस्ता जोडलेला आहे. या रस्त्यावरून वाडीतील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू असते; मात्र सद्यःस्थितीत या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्णांनादेखील याचा त्रास सहन करावा लागतो.
पावसाळ्यातील मोठे खड्डे आणि चिखलातून ग्रामस्थांना वाट काढावी लागते. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न खितपत पडून आहे. ग्रामपंचायत सदस्यांनी यामध्ये लक्ष घालावे आणि हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.