
कौशल्ये आत्मसात करून आत्मनिर्भर व्हा
86841
दोडामार्ग ः महिला सक्षमीकरण मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी प्रज्ञा परब, शशिकांत कासले, डॉ. अनघा पाटील, श्री. देसाई (उजवीकडे), प्रेमानंद देसाई. चंद्रशेखर सावंत, सोनू अनावकर (डावीकडे).
86842
दुसऱ्या छायाचित्रात मेळाव्यासाठी उपस्थित महिला वर्ग.
कौशल्ये आत्मसात करून आत्मनिर्भर व्हा
प्रज्ञा परब ः दोडामार्गमध्ये महिला मेळाव्यास प्रतिसाद
सिंधुदुर्गनगरी, ता. ४ ः निरनिराळी कौशल्ये आत्मसात करून महिलांनी आत्मनिर्भर होण्याची आवश्यकता आहे. तांत्रिक आणि यांत्रिक पद्धतीने शेती करून आपले कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम केले पाहिजे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या, प्रथितयश उद्योजक प्रज्ञा परब यांनी केले. दिलासा जनविकास प्रतिष्ठान या ग्रामीण विकास क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेतर्फे आयोजित महिला मेळाव्यात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
हा मेळावा न्यूयॉर्क स्थित एशिया इनिसिएटिव्हस या संस्थेच्या सहकार्याने झाला. या संस्थेच्यावतीने आणि ‘दिलासा’च्या सहभागाने सिंधुदुर्गात श्री पद्धतीद्वारे महिलांचे सक्षमीकरण प्रकल्प सुरू असून यात ११०० महिला सहभागी आहेत. या पध्दतीमुळे त्यांच्या भात उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. या सर्व लाभार्थी महिलांचा मेळावा दोडामार्ग येथे नुकताच झाला. या मेळाव्यात जिल्हा कृषी मार्गदर्शक तथा पोलिसपाटील संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर सावंत यांनीही मार्गदर्शन केले. श्री भात लागवडीची पद्धत शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असून जास्तीत जास्त शेती क्षेत्रावर तिचा अवलंब केला पाहिजे. केवळ घरापुरती शेती न करता पडीक जमीन भात लागवडीखाली आणून आपला आर्थिक विकास केला पाहिजे, असे ते म्हणाले. ‘दिलासा’च्या संस्थापक अध्यक्ष डॉ. अनघा पाटील यांचे प्रास्ताविक भाषण झाले. यावेळी त्यांनी २०१६ पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात श्री भात लागवडीसाठी दिलासा संस्था क्रियाशील असल्याचे सांगितले. आतापर्यंत सुमारे ७००० शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे. श्री पद्धतीचे फायदे लक्षात घेऊन आता या पध्दतीचे चळवळीत रुपांतर व्हायला पाहिजे. त्यासाठी महिलांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्रेमानंद देसाई यांनी केला. भातशेतीतून जास्त उत्पन्न मिळविण्यासाठी व्यावसायिक शेतीवर भर देणे आवश्यक आहे. शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसाय करण्यास महिलांनी प्राध्यान्य देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. हनुमंत गवस यांनी सूत्रसंचालन केले. शशिकांत कासले, सोनू अनावकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कृषितज्ज्ञ केदार चोवे यांनी आभार मानले.
---
महिलांनी व्यक्त केली मनोगते
मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे ‘श्री’ पद्धतीने भात लागवड केलेल्या महिलांनी व्यासपीठावरून मनोगत व्यक्त केले. यामध्ये सुवर्णा सावंत, रंगिता नोरजकर, शोभा पांचाळ, गायत्री गावकर, रुपाली गवस, प्रणिता ठाकूर यांनी सहभाग घेतला. व्यासपीठावर येऊन बोलण्याची पहिलीच वेळ असतानाही त्यांनी धीटपणे आपले अनुभव सांगून उपस्थितांची मने जिंकली.