
मंडणगड - बाणकोट सागरी हद्दीत बेकायदेशीर मद्य विक्रीस उधाण
बाणकोट सागरी हद्दीत
बेकायदेशीर मद्यविक्रीस उधाण
मंडणगड, ता. ५ ः पोलिस ठाण्याचे भय राहिले नसल्याने बाणकोट पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्व प्रकारच्या बेकायदेशीर मद्यविक्रीस उधाण आले आहे. या गंभीर विषयासंदर्भात पोलिस ठाण्यात कळित करण्यात आलेला असतानाही तक्रारींची दखल घेण्यात न आल्याने हद्दीतील देव्हारे, शिपोळे गाव, शिपोळे बंदर, वेसवी जेटी, वाल्मिकीनगर, बाणकोट किल्ला, गुडेघर, कोन्हवली, वेळास, वेळास दंडा अशा पंचक्रोशीत २५हून अधिक मद्यविक्रेते बिनबोभाट मद्य विकत आहेत.
देशी-विदेशी व पूर्णपणे बंदी असलेल्या गावठी दारूची विक्रीही अगदी राजरोसपणे सुरू आहे. या विक्रेत्यांना रायगड जिल्ह्यातून सर्व प्रकारच्या मद्याचा पुरवठा केला जातो. मद्यपुरवठा करणाऱ्यांवरही पोलिस ठाणेने कोणताही अंकुश ठेवलेला नाही. शिमगोत्सवात सर्व प्रकारच्या मद्यविक्रीचे टोक गाठले आहे. त्यामुळे शांततामय वातावरणात शिमगोत्सव साजरा होण्याची संकल्पना धोक्यात आलेली आहे.
मद्यविक्री करण्यासाठी शाळांमध्ये शिकणाऱ्या लहान बालकांचा वापरही होत असल्याच्या गंभीर चर्चा या अनुषंगाने तालुक्यात सार्वत्रिकरित्या सुरू आहे. निदान या चर्चेच्या आधारे तरी पोलिसांनी तपासाची गती वाढवण्याची नितांत आवश्यकता आहे. येथील कर्तव्यदक्ष कार्यतत्पर कर्मचाऱ्यांनी ही चर्चा खोटी ठरवण्यासाठी तरी बेकायदेशीर मद्यविक्रीविरोधात कारवाईचे शस्त्र उगारावे, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांमधून केली जात आहे.