
ठाकरे गटाचे ‘खिचडी’ आंदोलन ठाकरे गटाचे ‘खिचडी’ आंदोलन
87094
मालवण ः महागाईच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाने चुलीवर खिचडी शिजवत आंदोलन छेडून केंद्र, राज्य सरकारचा निषेध केला. (छायाचित्र ः प्रशांत हिंदळेकर)
ठाकरे गटाचे ‘खिचडी’ आंदोलन
राज्य, केंद्राचा मालवणात निषेध; वाढत्या महागाईविरोधात घोषणाबाजी
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३ : ‘फडणवीस-शिंदे भाई है, महाराष्ट्र मे महंगाई छाई है’, ‘मोदी सरकार हाय हाय’, अशा घोषणा देत आणि लाकडांनी पेटवलेल्या चुलीवर खिचडी शिजवत आज येथे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून गॅस दरवाढ व महागाई विरोधात राज्य व केंद्राचा निषेध करून आंदोलन करण्यात आले. महागाईने सामान्य जनतेचे हाल झाले असून पुढील काळात हे आंदोलन अधिक व्यापक केले जाईल, असा इशारा यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
येथील उद्धव ठाकरे पक्षाच्या शाखेसमोर महागाई विरोधात आंदोलन झाले. यावेळी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नितीन वाळके, शहरप्रमुख बाबी जोगी, महिला आघाडीच्या पूनम चव्हाण, सेजल परब, शिल्पा खोत, तृप्ती मयेकर, निनाक्षी मेतर, विद्या फर्नांडिस, शांती तोंडवळकर, साक्षी मयेकर, सन्मेष परब, तपस्वी मयेकर, भाई कासवकर, उमेश मांजरेकर, भगवान लुडबे, नरेश हुले, सिद्धेश मांजरेकर, यशवंत गावकर, गौरव वेर्लेकर, दत्ता पोईपकर आदी उपस्थित होते.
खोबरेकर म्हणाले, ‘‘राज्यातील गद्दार सरकार व केंद्रातील मोदी सरकारने महागाई वाढवून जनतेचे हाल केले आहेत. २०१४ पासून गॅस सिलेंडरची किंमत तिप्पट वाढली आहे, तर पेट्रोलचे भावही गगनाला भिडले आहेत. उद्योग, रोजगाराची केवळ आश्वासने देऊन दुसरीकडे महागाई वाढवली जात आहे. अधिवेशनात महागाईच्या मुद्यावर सरकार काहीच बोलत नाही. महाराष्ट्रावर बोलणाऱ्या इतरांचा सत्कार करायचा आणि खासदार संजय राऊतांवर हक्कभंग आणायचा, असे करून सरकार महागाईपासून जनतेचे लक्ष विचलित करू पाहत आहे. महागाईमुळे जनतेला पुन्हा चुली पेटवाव्या लागणार आहेत. म्हणूनच आज आम्ही चुलीवरील खिचडीचे आंदोलन छेडत निषेध केला. मोदी सरकारने गॅस योजना राबवून घराघरात गॅस सिलेंडर दिले; मात्र त्याच गॅसद्वारे लूट करून सरकार तोंडातील घास हिरावून घेणार, याची कल्पना जनतेला नव्हती; मात्र आम्ही सरकारच्या गळ्याचा फास आवळल्याशिवाय गप्प बसणार नाही. आजचे आंदोलन यापुढेही व्यापक करून सरकारविरोधात जिल्हाभरात रान पेटवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.’’
---
महागाईमुळे सामान्यांच्या डोळ्यात पाणी
वाळके म्हणाले की, खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेले भाजपचे आणि मोदी सरकारचे पितळ आज महागाईचा आगडोंब उसळल्याने उघडे पडले. पेट्रोल, गॅस सिलेंडर व वीज दरवाढ जनतेच्या सहनशीलतेच्या पलीकडची आहे. महागाईतून सरकारने शेतकरी आणि गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणले आहे. त्यामुळे या विरोधात व्यापक स्वरुपात आंदोलन पेटवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा दिला.