
मंडणगड - माहेरच्या '' ग्रामदेवतेची '' सासुरवाशींनींकडून आराधना
-rat७p९.jpg- KOP२३L८७३२८
पालेकोंड ः आंबवणे खुर्द येथील श्रीरवळनाथाची पालखीची पूजा आणि ओटी भरताना पाले सासुरवाशिणी.
माहेरच्या ग्रामदेवतेची
सासुरवाशिणींकडून आराधना
गावभेटीनंतर पालख्या माघारी ; वेशीवर जल्लोषात स्वागत
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ८ ः आपल्या सासरी आलेल्या माहेरच्या ग्रामदेवतेची मनोभावे पूजा करून सासुरवाशिणींनी आराधना केली. पुन्हा माघारी गावाकडे जाणाऱ्या ग्रामदेवतेची पालखी खांद्यावर नाचवत तिला भक्तिभावाने निरोप दिला. दुसऱ्या होळीला गावभेटीला बाहेर पडलेल्या पालख्या आठ दिवसांच्या शेकडों किलोमीटरच्या प्रवासानंतर ५ मार्चला संध्याकाळी पुन्हा आपल्या गावी माघारी परतल्या. या वेळी वेशीवर त्यांचे भाविकांनी जल्लोषात स्वागत केले. देवाच्या स्वागताला गावकऱ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. शिमग्याचा जोश शिगेला पोचला.
मंडणगड तालुक्यात ७३ सार्वजनिक, १६२ खासगी होळ्या आहेत. तालुक्यात एकूण ५५ पालख्या आहेत. शंकासूर, खेळ्यांसह गावभेटीला बाहेर पडलेल्या पालख्यांनी अनेक गावांचा शेकडों किमीचा प्रवास केला तर काही पालख्या शेवटच्या दोन दिवस गावातच फिरवण्यात आल्या. या वेळी नवस फेडण्यात आले. शेरणे काढण्यात आली. मानाची जेवणं झाली. शहरात पालखी महोत्सव साजरा करण्यात आला. संपूर्ण तालुका शिमगामय होऊन गेला. पोलिसांच्या सतर्कतेने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. पालख्या पुन्हा आपल्या गावी येणार म्हणून गावांच्या वेशीवर ग्रामस्थ, महिला, पुरुष, मुले आतुरतेने वाट पाहत होते. देवींचे आगमन होताच एकच जल्लोष करण्यात आला. पालखी खांद्यावर नाचवण्यासाठी चढाओढ झाली. वाजतनाचत पालख्या देवळात स्थानापन्न झाल्या. पुजारी, मानकरी, पाटील, खेळी, झेंडेकरी, वाजंत्री यांचा आदर सन्मान करण्यात आला. रात्री खेळ्यांसाठी मानाचे जेवण देण्यात आले. ६ मार्चला रात्री सर्वत्र होमाला पुन्हा फाग बोलण्यात आले. या वेळी मुंबईकर आवर्जून उपस्थित होते. तालुक्यात अजून दोन दिवस उत्साहात आणि आनंदात शिमगोत्सव साजरा होणार आहे.