
संक्षिप्त-गोठा कोसळून वेंगुर्लेत रेडा ठार
संक्षिप्त
गोठा कोसळून
वेंगुर्लेत रेडा ठार
वेंगुर्ले ः बाजारपेठेतील विष्णू वसंत तुळसकर यांच्या मालकीचा गोठा अचानक कोसळून एक रेडा ढिगार्याखाली सापडून गतप्राण झाला. तर अन्य आठ गुरे बचावली. ही घटना सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास घडली. गोठा कोसळत असल्याचे लक्षात येताच ग्रामस्थ मदतीला धावून आले. त्यांनी अन्य गुरांची सुटका केली.
पणदूरमध्ये राष्ट्रीय
विज्ञान दिन साजरा
कुडाळ ः पणदूर येथील पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयात भारतीय शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रमन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे, त्यांना प्रेरित करणे, विज्ञान आणि वैज्ञानिक कामगिरीबद्दल जागरूक करण्याच्या मुख्य उद्देशाने विज्ञान दिन प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. संगणकशास्त्र विभागप्रमुख प्रा. सिद्धी कुठाळे यांनी सी. व्ही. रमन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानिमित्त भाभा परमाणू अनुसंधान केंद्राचे शास्त्रज्ञ संतोष टाकळे यांच्या विज्ञानविषयक व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रा. तन्वी सिंघन व प्रा. सिद्धी कुठाळे यांनीही विज्ञानाचे मानवी जीवनातील महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले.
परब ज्ञातीबांधवांचा
कौंटुंबिक सोहळा
मालवण ः परब मराठा समाज, मुंबई यांच्यावतीने हिरक महोत्सवी वर्ष शुभारंभानिमित्त जागतिक महिला दिन आणि परब ज्ञातीबांधवांचा कौटुंबिक सोहळा १९ मार्चला सकाळी १० वाजता दादर-मुंबई येथील शिवाजी नाट्यमंदिर येथे आयोजित केला आहे. जागतिक महिला दिन सोहळ्यानिमित्त द. आर्ट स्टुडिओ, डोंबिवली निर्मित मराठमोळ्या महिलांचा बहारदार कार्यक्रम, परब ज्ञातीबांधवांचा कौटुंबिक सोहळा होणार आहे. परब मराठा समाजाचे अध्यक्ष व माजीमंत्री अॅड. अनिल परब, समाजाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन उपाध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण द. परब, कार्याध्यक्ष जगदीश ज. परब, खजिनदार शरद परब, सरचिटणीस जी. एस. परब, चिटणीस शैलेंद्र लवू परब, महिला संघटक प्रतीक्षा प्र. परब, जिल्हा संघटक विनायक परब यांनी केले आहे.
कारिवडेत आज
गौरपौर्णिमा उत्सव
ओटवणे ः श्री गौरांग महाप्रभू युगावतार यांच्या जन्म दिवसाच्या निमित्ताने इस्कॉनच्यावतीने कारिवडे-गवळीवाडी येथे उद्या (ता. ८) गौरपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त सकाळी ११ ते २ भजन, संकीर्तन, गौरकथा, (वक्ता अनिरुद्ध प्रभू), त्यानंतर गौरआरती आटोपल्यानंतर महाप्रसाद होणार आहे. भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन इस्कॉनचे लाईफ मेंबर नामदेव गवळी यांनी केले आहे.