
चिपळूण ः कळंबस्तेत फुलतोय सेंद्रिय शेतीचा ‘पोषण मळा`
फोटो - ratchl73.jpg ः KOP23L87411
चिपळूण ः कळंबस्ते येथील सेंद्रिय शेतीचा पोषण मळा.
कळंबस्तेत फुलतोय सेंद्रिय शेतीचा पोषण मळा
माहेश्वर मंडळ ; रेन पोर्ट प्रणालीद्वारे पाण्याची व्यवस्था
चिपळूण, ता. ७ ः शेतीमध्ये रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे सर्व सजीवसृष्टीसह मानवी जीवनदेखील धोक्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना निकोप आणि सकस अन्न मिळावे, त्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी सेंद्रिय आणि पर्यावरणीय शेतीच्या प्रयोगांना देखील सुरवात झाली आहे. याच भूमिकेतून चिपळूणमधील कळंबस्ते येथील माहेश्वर मंडळाच्या मालकीच्या सुमारे दोन एकर जमिनीमध्ये विकास सहयोग प्रतिष्ठानने बहुस्तरीय आणि जैवविविधतेवर आधारित सेंद्रिय उत्पादने, जैविक, बारमाही व भरघोस उत्पादनांचा विचार करणाऱ्यांसाठी संवाद केंद्र आणि या कार्यासाठी योगदान देऊ इच्छिणाऱ्यांसाठी पोषणमळाच्या रूपाने सेंद्रिय शेती प्रयोगाला सुरवात केली आहे.
कळंबस्ते येथील या प्रगोगामध्ये विकास सहयोग प्रतिष्ठानने सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला, फळभाज्या, वेलवर्गीय आणि कंदवर्गीय पिकांची लागवड केली आहे. संस्थेचे हे प्रयत्न सार्वजनिक व्हावेत, नागरिकांना या प्रयोगाची माहिती व्हावी म्हणून विविध स्तरावर संस्थेने जागृतीचे प्रयत्न सुरू देखील केले आहेत.
या प्रकल्पात हिरवा माठ, लाल माठ, पालक, मुळा, मेथी, भेंडी, वांगी, मिरची, दुधी, कारली, चवळी, वाल, पावटा, भोपळा, काकडी, घेवडा, कलिंगड आदींची व्यापारी आणि प्रायोगिक तत्त्वावर विक्री आणि संवर्धनार्थ लागवड केली आहे. पाण्याचा अपव्यय होऊ नये आणि मानवी श्रम वाचावेत म्हणून या सर्व प्रकारच्या लागवडीस रेन पोर्ट प्रणालीद्वारे पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून, परिसरात मिळणारा पालापाचोळा, शेणखत, जैवभार संकलित करून त्यापासून खतनिर्मिती, जमिनीचे सजीवीकरण, जमिनीची सकसता आणि सुपिकता वाढवण्यासाठी बायोडायनॅमिकल पद्धतीचे प्रयत्न केले जात केले आहेत. उत्पादन, विक्री, संगोपन, संवर्धन, अभ्यास आणि प्रचार प्रसार या बहुसुत्रींवर आधारित सुरू असलेला हा प्रयोग रत्नागिरी जिल्ह्यातील सेंद्रिय शेतीची चळवळ उभी करण्याकरिता दिशादर्शक ठरावा, शेतीक्षेत्रातील सर्व जिज्ञासू, जाणकार आणि तज्ज्ञ व्यक्तींसाठी माहिती आणि अभ्यास, योगदानाचे क्षेत्र बनावे यासाठी हा प्रयोग साकारण्यात येत आहे.
सेंद्रिय खताची निर्मिती
शेणखत, सुका आणि ओला पालापाचोळा एकत्रित करून त्यावर प्रक्रिया केली जात असून, त्यापासून देखील खतनिर्मिती केली जात आहे. त्याचबरोबर परिसरातील माती आणि पाण्याच्या संवर्धनावर संस्थेने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. माणसाचे आरोग्य, सभोवतालचा परिसर आणि सर्व प्राणीमात्रांना परस्परावलंबी जीवन जगता यावे, ७ स्तर पद्धतीने जमिनीचे सर्व भाग पिकांसाठी उपयोगात यावेत म्हणून संस्था हा अभिनव उपक्रम राबवत आहे.