
बांद्यातील केएफडी कक्ष इतर सुविधांसाठी वापरावा
87517
बांदा ः डॉ. जगदीश पाटील यांना निवेदन देताना रियाज खान, संतोष तारी व अन्य. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)
बांद्यातील केएफडी कक्ष
इतर सुविधांसाठी वापरावा
शिवसेनेची मागणी; प्रशासनास निवेदन
बांदा, ता. ७ ः येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात माकडताप रुग्णांसाठी बांधण्यात आलेला केएफडी कक्ष विनावापर पडून असल्याने या कक्षाचा वापर इतर वैद्यकीय सुविधा देण्यासाठी करावा, अशा आशयाचे निवेदन शिवसेनेचे अल्पसंख्यांक उपाध्यक्ष रियाज खान यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांना दिले. यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन डॉ. पाटील यांनी दिले.
निवेदनात म्हटले आहे की, काही वर्षांपूर्वी बांद्यात माकडतापाची साथ आली होती. यामध्ये कित्येकांना जीव गमवावा लागला. त्यावेळी या रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र केएफडी कक्ष उभारण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला. गेल्या वर्षभरात बांदा शहर किंवा परिसरात माकडतापाचा एकही रुग्ण न सापडल्याने हा कक्ष विनावापर पडून आहे. बांदा आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याने या कक्षाचा इतर वैद्यकीय सुविधा देण्यासाठी वापर करावा, अशी मागणी केली आहे. यावेळी राजा खान, मोहसीन खान, संतोष तारी, व्यंकटेश उरुमकर, रिझवान खान, सदा राणे आदी उपस्थित होते.