
वैद्यकीय पेशात मानव सेवेची संधी
87701
कुडाळ ः स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करताना डॉ. संजीव आकेरकर. शेजारी उमेश गाळवणकर, अमृता गाळवणकर आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)
वैद्यकीय पेशात मानव सेवेची संधी
डॉ. संजीव आकेरकर; कुडाळात वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा
कुडाळ, ता. ८ ः ध्येय निश्चित करून ते साध्य होईपर्यंत स्वस्थ बसू नका. त्यासाठी माघार घेऊ नका. सतत प्रयत्नशील राहा. डॉक्टरकी पेशाच्या निमित्ताने मानव सेवेसारखे पवित्र क्षेत्र तुम्हाला मिळाले आहे. तेथे तणामुक्त राहून रुग्णसेवा करा, असे प्रतिपादन प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. संजीव आकेरकर यांनी केले.
येथील बॅ. नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. आकेरकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उमेश गाळवणकर, कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक, बॅ. नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सूरज शुक्ला, श्रीवर्धन आरोसकर, महिला महाविद्यालयाचे व रात्र महाविद्यालयाचे प्रा. अरुण मर्गज, बी.ए. महाविद्यालयाचे प्रा. परेश धावडे, संस्थेच्या सीईओ अमृता गाळवणकर आदी उपस्थित होते.
डॉ. आकेरकर यांनी, ध्येय प्राप्त करताना प्रतिकूल गोष्टी घडल्यास निराश न होता सामोरे जा; नक्कीच संधी मिळेल. प्रयत्न सोडू नका. ज्यांच्यामुळे आज समाजात उभे आहोत, त्या आई-वडिलांचे आणि गुरूंचे ऋण कधीच विसरू नका, असे आवाहन केले. तहसीलदार पाठक यांनी स्नेहसंमेलनातून तुमच्यातील अन्य कलागुण जोपासा. वैद्यकीय पेशामध्ये राहून परोपकाराची साथ सोडू नका. त्यातून मिळणारा आनंद मोठा असतो, त्यातून अधिक काळ ऊर्जा मिळते, असे सांगत गाळवणकर व त्यांचे सर्व सहकारी शिक्षकांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. गाळवणकर म्हणाले की, जेव्हा आपण समाजासाठी काम करतो, तेव्हा परमेश्वर मदतीला धावतो. कोरोना काळात आमची संस्था आणि नर्सिंगच्या शिक्षक, विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी काम केले. सामाजिक कार्य परमेश्वरार्पण करा. विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे स्नेहसंमेलनात सहभागी होत आपल्यातील कलागुण कलागुण सादर केले. डॉ. सूरज शुक्ला यांनी प्रास्ताविक केले. दिशा कांगडे, मंदार जोशी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शरावती शेट्टी यांनी आभार मानले.