
वैभववाडीचे स्टॉल पूर्ववत करा
87800
वैभववाडी ः येथील तहसिल कार्यालयासमोर स्टॉलधारक महिलांनी उपोषण सुरू केले.
वैभववाडीचे स्टॉल पूर्ववत करा
महिला स्टॉलधारकांची मागणी; प्रशासनाची पाठ, आंदोलक भूमिकेवर ठाम
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ८ ः वैभववाडीत राबविण्यात आलेल्या स्टॉल हटाओ मोहिमेमुळे अनेकांची रोजीरोटी गेली. त्यामुळे त्याच जागेत पुन्हा स्टॉल पूर्ववत उभे करण्यात यावेत, या मागणीसाठी आज सकाळपासून महिला स्टॉलधारकांनी येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. या उपोषणाकडे कुणीही अधिकारी उशिरापर्यंत फिरकला नाही. त्यामुळे उशिरापर्यंत हे उपोषण सुरू होते. उपोषणकर्त्या महिला आपल्या भूमिकेवर ठाम होत्या.
वैभववाडी नगरपंचायतीच्या प्रशासनाने मनमानीने स्टॉल हटाव मोहीम राबविली. त्यामुळे अनेक महिलांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची आणि मुख्याधिकाऱ्यांनी राबविलेल्या स्टॉल हटाओ मोहिमेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महिला स्टॉल संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या मागणीबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्यामुळे आज सकाळपासून राजश्री पाटील, भारती बोडेकर, मानसी बागवे, सुलक्षणा जाधव, निशिगंधा माळकर, अतिना करकोटे, राखी कदम, दीपाली होळकर, वैशाली महाडीक, शेवंता साळवी आदी महिला स्टॉलधारकांनी उपोषण सुरू केले.
---
अधिकारी फिरकलेच नाहीत
पूर्वी असलेल्या जागेवर स्टॉल लावण्यास दिले जात नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याची भूमिका उपोषणकर्त्या महिलांनी घेतली. या उपोषणकर्त्यांची सायंकाळी उशिरापर्यंत कुणीही वरिष्ठ अधिकाऱ्याने भेट घेतली नाही. त्यामुळे सायकांळपर्यंत उपोषण सुरूच होते. स्टॉलधारक महिलांनी नगरपंचायत प्रशासनावर अनेक आरोप केले आहेत.