
सरमळे पूल पावसाळ्यापूर्वी खुले
swt९१८.jpg
८७९४६
सरमळेः दाभिल नदीवरील पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. (छायाचित्रः महेश चव्हाण)
सरमळे पूल पावसाळ्यापूर्वी खुले
कामाला वेगः २ कोटी ३२ लाखाचा निधी
सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. ९ः बांदा-दाणोली जिल्हा मार्गावरील सरमळे येथील दाभिल नदीवरील नियोजित पुलाच्या नूतन बांधणीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी ते पूर्ण करून वाहतुकीस खुले करण्याचे नियोजन आहे. २ कोटी ३२ लाख ८९ हजार रुपये मंजूर असलेल्या या पुलाची लांबी ४० मीटर असून रुंदी १२ मीटर आहे. तर उंची सुमारे ६ ते ७ मीटर असणार आहे. काम वेगवान पद्धतीने सुरू असून मे अखेरीस काम पूर्ण होईल, अशी आशा आहे. सध्या एका भिंती खाबांचे काम जवळपास पूर्ण झाले असून दुसऱ्याचे सुरू आहे.
बांदा-दाणोली मार्ग हा दोन महत्त्वाच्या पर्यटन ठिकाणांना जोडतो. आंबोली व गोवा राज्य या दोन पर्यटन ठिकाणांना जोडणारा हा पर्यायी व सुलभ मार्ग आहे. आंबोली या थंड हवेच्या तसेच फेसाळणाऱ्या धबधब्याखाली वर्षा पर्यटनाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी गोव्याच्या पर्यटकांची या मार्गावर मोठी वर्दळ असते. तर कोल्हापूर, बेळगाव, पुणे येथून कच्चा माल, भाजीपाला गोवा येथे नेण्यासाठी अवजड वाहनांची रेलचेल या मार्गावर दिवसभर असते. त्यामुळे या मार्गावरील पुलाचे महत्त्व अधिक आहे. बांदा, सावंतवाडी यासह गावागावांत वाढत्या शहरीकरणामुळे या मार्गाला सुद्धा दिवसरात्र वर्दळीचे स्वरूप आले आहे. वाहनांची गर्दी बघता विस्तारित जाणाऱ्या या मार्गाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
रहदारीसाठी सोयीस्कर आणि एकमेव पर्यायी मार्ग असलेल्या सरमळे येथील या पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होऊन तो वाहतुकीस खुला होईल, अशी माहिती संबंधित बांधकाम विभाग तसेच ठेकेदार यांनी दिली.