मौनव्रतासह तिसऱ्यांदा नर्मदा परिक्रमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मौनव्रतासह तिसऱ्यांदा नर्मदा परिक्रमा
मौनव्रतासह तिसऱ्यांदा नर्मदा परिक्रमा

मौनव्रतासह तिसऱ्यांदा नर्मदा परिक्रमा

sakal_logo
By

swt९२५.jpg
८८००१
बांदा परिक्रमेबद्द्ल माहिती देताना नवनाथ नाईक. (छायाचित्र - निलेश मोरजकर)

मौनव्रतासह तिसऱ्यांदा नर्मदा परिक्रमा
डिंगणेतील नवनाथ नाईकांचा प्रवास ः चार महिने केवळ फलाहार
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ९ ः आध्यात्मिक उंची वाढविण्यासाठी मौनव्रत धारण करून डिंगणे येथील नवनाथ लक्ष्मण नाईक (वय ५९) यांनी तिसरी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. अन्नपदार्थ न खाता केवळ फलाहारावर चार महिने चार हजार किलोमीटर पायी प्रवास करत परिक्रमा पूर्ण करण्याचा संकल्प त्यांनी यशस्वी केला. परिक्रमा धार्मिक अंगाने केली जात असली तरी वाटेत पावलोपावली भेटणारा निसर्ग परिक्रमावासीला अंतर्मुख होण्यापलीकडेही बरेच काही शिकवून जातो. आज सलग तीन वर्षे परिक्रमा केल्याने त्रिवार नर्मदा परिक्रमा झाली, असे श्री. नाईक यांनी सांगितले.
नर्मदा ही मध्यप्रदेश व गुजरात या दोन राज्यांतून वाहणारी प्रमुख नदी आहे. अमरकंटक शिखरातून तिचा उगम होतो व अरबी समुद्रास मिळते. डिंगणे येथील नवनाथ नाईक यांनी वयाच्या ५७ व्या वर्षी पायी परिक्रमा करण्याचा संकल्प करून सुमारे चार हजार किलोमीटर चालत तो तडीस नेला. सुमारे ११७ दिवस परिक्रमेला लागतात. यात दिवसाला ३० किलोमीटरचा प्रवास केला जातो. २०२० साली चार हजार किलोमीटरच्या पहिल्या परिक्रमेत केवळ जेवण करत होतो. त्यानंतर आपल्या जीवनात परिवर्तन होत अमुलाग्र बदल झालेला दिसून आला. २०२१ साली त्यांनी दुसरी परिक्रमा पूर्ण करताना अध्यात्म वाढण्यासाठी जेवण न करता केवळ दुध व फलाहार घेतला. यात ११० दिवस लागले. त्यावेळी काही प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध झाल्या. तर २०२२ मध्ये सुरू केलेल्या परिक्रमेत त्यांनी बदल केला. आपली आध्यात्मिक उंची वाढविण्यासाठी चार महिने मौनव्रत धरत चार हजार किलोमीटरचा टप्पा ११७ दिवसांत पायी पार पाडला. यामध्ये मौन बाळगत केवळ फलाहार केल्याचे ते म्हणाले.
वयाच्या ५४ व्या वर्षीपर्यंत मला चालणे शक्य होत नव्हते. दासबोध हा माझ्या जीवनाचा एक भाग आहे. त्यामुळे सज्जनगड येथे १२-१३ वर्षे पायी जात समर्थांची साधना केली आणि त्यानंतर परिक्रमेचा ध्यास उराशी बाळगला. धार्मिक आध्यात्मिकता स्वस्थ बसू देत नव्हती. आजोबा आपले गुरू असून त्यांचा आध्यात्मिक वारसा मिळाला व प्रगती झाली, असे नाईक यांनी सांगितले. श्री समर्थ रामदास स्वामी, नर्मदा माता यांचा आशिर्वाद देवी सातेरी माऊली माता आणि माझे आई-वडील यांच्या प्रेरणेने, आजोबा कृष्णा मोपकर, मामा रामा मोपकर यांच्या मार्गदर्शनामुळे माझ्या अध्यात्म जीवनाचा प्रवास सुरू झाला व नर्मदा मातेची परिक्रमा सलग तीन वेळा करू शकलो, असे त्यांनी भावनिक होऊन सांगितले.

चौकट
परिक्रमेचे महत्त्व व नियम
नर्मदा परिक्रमा कुठल्याही घाटावरून करू शकता. नर्मदा मातेचे शेवटचे जल ओंकारेश्वरलाच अर्पण करावे लागते. तसेच जर अमरकंटक येथून सुरुवात केल्यास अमरकंटकमध्ये परिक्रमा पूर्ण होते; परंतु शेवटचे जल ओंकारेश्वरला मातेच्या चरणीच अर्पण करावे लागते, असा परिक्रमेचा नियम असल्याचे नाईक म्हणाले. शरीरातील शक्ती बोलण्यात खर्च घालतो, त्या शक्तीची साठवण आपल्या शरीरात होते. तसेच बोलण्यात खर्च होणाऱ्या वेळेत नर्मदा नदीची भक्ती करता येईल आणि नर्मदा परिक्रमा सुलभ होईल. परिक्रमा म्हणजे केवळ चालणे नाही, तर स्वतःच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी जी मातेने परिक्रमा दिलेली आहे, त्याचे अनुकरण होय. प्रत्येक तीर्थक्षेत्राचे महत्त्व, आश्रमाची महती काय आहे ते जाणून घेतल्यास जीवनात नक्कीच बदल होतो, असेही ते म्हणाले.