
क्राइम पट्टा
मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर
रत्नागिरी : तालुक्यातील करबुडे येथे मोटारीने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रत्नागिरी ते करबुडे जाणार्या रस्त्यावर चार चाकी (एमएच-०८-झेड-५५०४) वरील चालकाचा ताबा सूटला. त्यामुळे त्याने रस्त्याच्या विरुध्द दिशेला जात समोरुन येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही इतकी जोरदार होती त्यात कारचा पुढील उजव्या बाजुचा टायरही फूटला. या अपघाताची ग्रामीण पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.
मुरूगवाड्यातून दुचाकी चोरीला
रत्नागिरी : शहरातील मुरुगवाडा येथील घराच्या अंगणात पार्क केलेली दुचाकी अज्ञाताने लांबवली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (ता. ४) मध्यरात्री ते दुसर्या दिवशी सकाळी १० वाजण्याच्या कालावधीत घडली. याबाबत साहिल बिजु नायर (वय २१, रा. पिलणकरवाडी मुरुगवाडा, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानूसार शनिवारी साहिल नायर यांनी आपली दुचाकी (एमएच-०८-एझेड-४८८९) घराच्या अंगणात पार्क करुन ठेवलेली होती. दुसर्या दिवशी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ते अंगणात गेले असता त्यांना दुचाकी दिसली नाही. त्यांनी आजुबाजुला दुचाकीचा शोध घेतला असता दुचाकी मिळाली नाही. त्यांनी शहरात इतर ठिकाणी शोध घेऊन बुधवारी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.