
राधानृत्यातून मिळालेली रक्कम मंदिरासाठी
88370
पिंगुळी ः शिमगोत्सवातील राधानृत्याच्या माध्यमातून कला सादर करताना मंदिर कामासाठी मदत दिलेले पिंगुळी-शेटकरवाडीतील कलावंत. (छायाचित्र ः अजय सावंत)
राधानृत्यातून मिळालेली रक्कम मंदिरासाठी
पिंगुळी-शेटकरवाडीचा आदर्श; विधायक कार्याचे कौतुक
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ११ ः शिमगोत्सवानिमित्त पिंगुळी-शेटकरवाडी ग्रामस्थ व मंडळाने राधानृत्यातून शबयच्या रुपात जमा केलेली रक्कम वाडीतील श्री देव महापुरुष मंदिराच्या कामकाजासाठी सुपूर्द केली. या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
कोकणात शिमगोत्सवात म्हटल की रंगपंचमीत रंगाची उधळण करत हा सण आनंदाने साजरा केला जातो. दीड दिवसांपासून ते पंधरा दिवसांपर्यंत हा सण जिल्ह्यात ठिकठिकाणी आपापल्या प्रथा परंपरेने ग्रामस्थ साजरा करतात. या शिमगोत्सवात घरोघरी राधानृत्यासह विविध सोंगे फिरविण्याची प्रथा आजही कायम आहे. शेटकरवाडी ग्रामस्थ व मंडळाने राधानृत्याची कला जोपासताना शिमगोत्सवात घरोघरी राधानृत्यासह विविध सोंगे काढली. शेटकरवाडीत सुमारे ९० घरे असून प्रत्येक घरासमोर राधानृत्य सादर केले जाते. या राधानृत्य कलेतून शबयच्या रुपात मिळालेली रक्कम वाडीतील श्री देव महापुरुष मंदिराच्या कामकाजासाठी देण्यात आली. हे आदर्श कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे. राधानृत्यात राधा-भाई ठाकूर, कृष्ण-अभी राऊळ, कांतारा-छोटू दळवी, हनुमान-संदीप सडवेलकर, राक्षस-बंटी ठाकूर, अस्वल-अक्षय सावंत, सिंह-अमोल सावंत, ऋषी-नीलेश सावंत, भटजी-मकरंद परुळेकर आदींचा सहभाग आहे. तर संगीत साथ हार्मोनियम विकी सावंत, प्रणय पालकर, उमेश सावंत, पखवाज तुषार धुरी, सुंदर गावडे, केतन लाड, विष्णू सडवेलकर, आबा सडवेलकर, सौरभ सर्वेकर, झांज प्रवीण सावंत, गणपत सावंत, गायक-भालेकर, बाळा आगलावे, दिनेश राणे यांचा समावेश आहे. या कलावंतांनी मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करून मिळविलेले ५०,५०५ रुपये मिळविले. त्यातील सर्व पात्रे तसेच वेशभूषा, रंगकाम, मानधन खर्च वगळून उर्वरित ३६,४०५ रुपयांची रक्कम महापुरुष मंदिर कामकाजासाठी सुपूर्द केली.