ठाकरेंच्या बेरजेच्या राजकारणाला भाजपाचा खो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाकरेंच्या बेरजेच्या राजकारणाला भाजपाचा खो
ठाकरेंच्या बेरजेच्या राजकारणाला भाजपाचा खो

ठाकरेंच्या बेरजेच्या राजकारणाला भाजपाचा खो

sakal_logo
By

ठाकरेंच्या बेरजेच्या राजकारणाला भाजपचा खो
संजय कदमांना थांबविण्यासाठी प्रयत्न; सदानंद कदमांवरील कारवाईचा उपयोग
चिपळूण, ता. ११ ः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांना आपल्या संघटनेत प्रवेश देऊन कोकणात बेरजेच्या राजकारणाला सुरवात केली आहे; मात्र सदानंद कदम यांच्या विरोधातील ईडीच्या कारवाईमुळे संजय कदम आणि शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. या खेळीचा नक्की कोणाला फायदा होईल, हे भविष्यात होणाऱ्या घडामोडीतून स्पष्ट होणार आहे.
रत्नागिरी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या वर्षीच्या फुटीपूर्वी या जिल्ह्यात शिवसेनेचा एकछत्री अंमल होता. येथील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर पालिकांवर या पक्षाचे वर्चस्व होते. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजप हे तिन्ही पक्ष, काही विशिष्ट भाग वगळता जिल्ह्यात प्रभावी नाहीत. त्याचा फायदा उचलून शिवसेनेने वाड्यावस्त्यांपर्यंत कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले; पण गेल्या वर्षी जूनमध्ये विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मूळ शिवसेनेत फूट पडल्यानंतर आमदार-खासदारांचा मोठा गट बाहेर पडला. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या चार आमदारांपैकी विद्यमान पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार योगेश कदम हे दोघेजण शिंदे गटाला जाऊन मिळाले आहेत. माजी मंत्री रामदास कदम आणि माजी आमदार सदानंद चव्हाण हेही या दिंडीत सहभागी झाले आहेत. उत्तर भागात ज्येष्ठ नेते आमदार भास्कर जाधव वगळता ठाकरे गटाकडे सक्षम, अनुभवी नेतृत्व नाही. अशा परिस्थितीत संघटनेची पुनर्बांधणी करत असताना कोकणच्या उत्तर भागात त्यांना शिवसेना शैलीतील आक्रमक नेत्याची गरज होती. ही पोकळी भरून काढण्यासाठी संजय कदम यांचा प्रवेश झाला आहे. दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी आणि संजय कदम यांची ताकद एकत्र आली तर दापोली मतदार संघात रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम यांचा पराभव करणे सोपे जाईल असे भाजपचे गणित आहे. संजय कदम यांच्या सेनेतील प्रवेशाच्यावेळी तयार झालेले वातावरण ठाकरे गटासाठी पोषक होतेच. रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम हे संजय कदम यांना पडद्यामागून मदत करतात, हे सर्वश्रुत आहे. ठाकरेंचा कोकण दौरा होण्यापूर्वी त्यांची मातोश्रीवर उठबस सुरू होती. ठाकरेंची खेडमधील सभा यशस्वी झाल्यानंतर भाजपने सूत्रधाराचा शोध घेण्यास सुरवात केली.
दरम्यान सदानंद कदम यांच्यावर दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी ईडीची कारवाई झाली. संजय कदम यांना थांबवण्यासाठी आणि शिवसेनेला शह देण्यासाठी या कारवाईचा उपयोग करता येऊ शकतो हे भाजपच्या ध्यानी आले.
-----------
चौकट
ठाकरेंची सभा सैनिकांना संघटित करणारी
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंनी सुरू केलेले राजकारण सामान्य कार्यकर्त्यांच्यादृष्टीने निश्चितच उत्साहवर्धक आहे. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या तंबूत दाखल झाले असले तरी कार्यकर्ते संघटनेशी बऱ्यापैकी निष्ठावान राहिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच अपेक्षित आहेत. ठाकरे यांची सभा त्या दृष्टीने कोकणातील सैनिकांना संघटित करण्यासाठी उपयुक्त ठरली आहे.
--------
कोट
भाजपला मतदारांनी मतदान करावे, असे सामान्यांच्या हिताचे कोणतेही काम भाजप सरकारकडून होत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांना धमकावण्यासाठी ईडीचा वापर केला जात आहे. आगामी निवडणुकीत भाजपला त्याचा हिशोब द्यावा लागेल.
- संजय कदम, माजी आमदार, दापोली