
साखरपा-पालखी भेट परंपरा नसलेले कनकाडी गाव
फोटो ओळी
-rat12p26.jpg-KOP23L88651 साखरपा : कनकाडी गावाची पालखी.
------
पालखी भेट परंपरा नसलेले कनकाडी गाव
कनकाडी, करंबेळेच्या पालख्या ; एकाच दिवशी येऊनही भेट नाही
साखरपा, ता. १२ : कोकणात अनेक गावात आजूबाजूच्या गावांमधून पालख्या येतात आणि त्यांची भेट ही परंपरा साजरी होते. पण संगमेश्वर तालुक्यातील कनकाडी हे गाव मात्र त्याला अपवाद आहे. या गावात दोन पालख्या एकाच दिवशी येऊनही त्यांची भेट न होण्याची परंपरा आहे.
संगमेश्वर तालुक्यात बहुतांश गावात पालखी सोहळा होळीच्या दुसर्या दिवशी सुरू होतो. कनकाडी गावात मात्र पालखी बाहेर पंचमीच्या दिवशी. पहिल्या दिवशी कनकाडी गावाची पालखी ही प्रथम गांगोबाच्या मूळ देवस्थानाला नेऊन तेथून मानेने ब्राह्मण समाजातील घरांमध्ये आणण्यात आली. त्याच दिवशी बाजूच्या करंबेळे गावातील पालखी गावात आणण्यात आली. कनकाडी गावातील ब्राह्मण समाज हा पूर्वी करंबेळे गावातील खोत होते. त्यामुळे ही पालखी मानाने कनकाडी गावात आणली जाते. कनकाडी गावातील ब्राह्मण समाजाची घरी ही पालखी जाते. त्याच प्रमाणे गावातील सोनार समाजातील एका घरातही ही पालखी मानाने जाते. ह्या समाजातील पूर्वज हे करंबेळे गावाच्या देवाच्या मुखवट्यांची साफसफाई करत होते. त्यामुळे त्या मानाने ही पालखी त्या घरातही जाते.
पण एकाच दिवशी एकाच वाडीत या पालख्या फिरत असूनही त्यांची भेट न घडवण्याची परंपरा आहे. आजही दोन्ही गावाचे भाविक दोन्ही पालख्यांचा दर्शनाला जातात, नवस करतात, घरोघरी पालख्या नाचवतात पण पालख्या भेटवत नाहीत. कनकाडीची पालखी एका घरातून पुढे गेली की मागून करंबेळे गावची पालखी आणली जाते.