
कुडाळात विकासकामांचा धडाका
88656
पणदूर ः येथे विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी नीलेश राणे. शेजारी इतर. (छायाचित्र ः अजय सावंत)
कुडाळात विकासकामांचा धडाका
पणदूरमधून प्रारंभ; नीलेश राणेंचा पुढाकार, केंद्र, राज्य सरकारची मदत
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १२ ः केंद्र आणि राज्यात आता भाजपचे सरकार आहे. यामुळे विकासकामांना गती मिळेल. भविष्यात पणदूर परिसरातील अनेक कामे भाजपच्या माध्यमातून केली जातील, असे आश्वासन भाजप नेते माजी खासदार नीलेश राणे यांनी दिले. पणदूर गावासह तालुक्यात राणे यांच्याकडून कोट्यवधी विकासकामांच्या भूमिपूजनाचा धडाका लावण्यात आला. त्यांच्या हस्ते आज तालुक्यात विकासकामांचा प्रारंभ करण्यात आला.
तालुक्यातील पणदूर येथील विकासकांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पणदूर गावचे माजी सरपंच तथा भाजप तालुकाध्यक्ष दादा साईल, भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य आनंद शिरवलकर, श्रीपाद तवटे, डॉ. अरुण गोडकर, जगदीश उगवेकर, दीपक साईल, योगेश घाडी, मनोरंजन सावंत, अनंत पाटकर, साई दळवी, अमित तावडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान श्री. राणे म्हणाले, ‘‘पणदूर गावच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. येथील अजून काही कामे अपूर्ण असतील तर त्यासाठी आवश्यक तो निधी देवू. मागील ८ महिन्यात सिंधुदुर्गात विकासकामांसाठी निधी उपलब्ध होत असून त्यापूर्वी अडीच वर्षे हा जिल्हा वंचित राहिला. केवळ मागच्या अडीच वर्षात राजकीय हेवेदावे दिसून आले. आता केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार असून यामुळे विकासकामांना गती मिळेल. मागे पणदूर गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत साईल यांचा पराभव झाला तरी खचून न जाता त्यांनी गावात विकासकामे केलीत.’’
--------
गावच्या विकासाला हातभार
यावेळी श्री. साईल यांनी भाजप नेते राणे यांचे स्वागत केले. यावेळी पणदूर गावच्या विकासात राणे यांचा मोठा हातभार असून त्यांनी आजपर्यंत मोठ्या प्रमाणात निधी या गावासाठी उपलब्ध करून दिला आहे, असे साईल यांनी सांगितले. येत्या काळात मालवण मतदारसंघातून राणे यांना आमदारकीचे तिकीट मिळावे, अशी पणदूरवासीयांची इच्छा असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. पणदूरमधील उर्वरित विकासकामे लवकरच पूर्ण करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच भाजप नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.