
बदली झालेल्या शिक्षकांना 31 मे पुर्वी कार्यमुक्ती
जिल्हा परिषद-KOP22K95917
बदली झालेल्या शिक्षकांना
३१ मेपूर्वी कार्यमुक्त करणार
जिल्हा परिषद शिक्षण विभाग ; दीड हजाराहून अधिक शिक्षक
रत्नागिरी,ता. १२ ः ग्रामविकास विभागामार्फत प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांची कार्यवाही सध्या सुरू आहे. जिल्हांतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना १ ते ३१ मे या कालावधीत कार्यमुक्तीचे आदेश देण्यात येणार आहेत. त्यामुळे जूनपासून बदली शिक्षक नवीन प्राथमिक शाळांवर रुजू होतील. या प्रक्रियेत १ हजार ५१३ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरवातीला धिम्या गतीने सुरू होती; मात्र ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आतापर्यंत संवर्ग एक ते चारच्या बदल्यांची प्रक्रिया वेगाने झाली. बदली पात्र असलेल्या टप्प्यातील शिक्षकांमध्ये पहिल्याच पसंतीची शाळा मिळालेले ४८४ शिक्षक असून हे प्रमाण ५६ टक्के आहे. १ ते ५ क्रमाकांच्या शाळा मिळालेल्यांची संख्या ७३८ असून हे प्रमाण ८२.३६ टक्के आहे. ऑनलाईन बदली प्रक्रियेनंतर शिक्षकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. ज्या शिक्षकांना पहिल्या पसंतीची शाळा मिळालेली नाही, त्यांना अपेक्षित शाळेच्या आजुबाजूची शाळा देण्यात आली आहे. त्यामुळे समाधानी असलेल्या शिक्षकांचा टक्का वाढला आहे. आतपर्यंत चार संवर्गातील मिळून १ हजार ५१३ शिक्षकांच्या जिल्हांतर्गत प्रक्रियेत बदल्या झालेल्या आहेत.
जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहेत. त्यानंतर ११ मे रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हांतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्तीचे आदेश देण्यात येणार आहेत. १२ जूनपासून शिक्षकांनी बदली झालेल्या शाळांवर हजर राहणे बंधनकारक आहे. ऑनलाईन बदल्यांमुळे शिक्षकांना शाळा बदलून मिळणार नाही. ग्रामविकास विभागाने यंदा प्रथमच ऑनलाईन बदल्या केल्या. मात्र, त्याला खूपच उशीर लागला आहे. २०२३- २०२४ या शैक्षणिक वर्षासाठी बदलीस पात्र असलेल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया १५ मेनंतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक शाळांना नवीन शैक्षणिक वर्षात नवीन शिक्षक मिळणार असून या शिक्षकांवर शैक्षणिक दर्जेबरोबरच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची जबाबदारी राहणार आहे.