''स्वप्ननगरी''तील दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तू

''स्वप्ननगरी''तील दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तू

८८७६७

‘स्वप्ननगरी’तील दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तू
महिला दिनानिमित्त उपक्रम ः शिक्षक संघ महिला सेलचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १३ ः अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, महिला सेल कुडाळ यांच्यावतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मोरे (ता. कुडाळ) येथील स्वप्ननगरी हेल्पर्स ऑफ दि हॅण्डी कॅप्ड संस्थेला भेट दिली. यावेळी संस्थेला जीवनावश्यक वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. संस्थेच्या व्यवस्थापिका जयश्री गोखले व दिव्यांग बांधवांशी महिला सेलच्या पदाधिकारी, सदस्यांनी संवाद साधला. हेल्पर्स ऑफ दि हॅण्डी कॅप्ड कोल्हापूर संस्थेचा स्वप्ननगरी-अपंगार्थ वसतिगृह तथा पुनर्वसन केंद्र उपक्रम प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
दिव्यांग बांधवांसाठी महिला सेलच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. यामध्ये गहू, डाळ, कडधान्य, तेल, मसाले, गूळ व खाऊ इत्यादी सर्व वस्तूंचा समावेश होता. व्यवस्थापिका गोखले यांनी या संस्थेचा इतिहास उलगडला. संस्थेच्या संस्थापक नसिमा हुरजुक व रजनी देशपांडे दिव्यांग भगिनी आहेत. महिला म्हणून त्या कोठेही कमी पडल्या नाहीत. अपंगत्वावर मात करून कोल्हापूरसह सिंधुदुर्गातही अपंगांच्या सेवेसाठी त्यांनी कार्य केले. दिव्यांगांना स्वबळावर उभे राहण्याची ताकद त्यांनी दिली. त्याचे उत्तम उदाहरण मोरे संस्थेमध्ये पाहावयास मिळत असल्याचे त्या म्हणाल्या. ''सुख-दुःखाचे घास दे, परी पचवायची शक्ती दे. पराभवाचे घाव झेलता, हसवायची युक्ती दे'' या प्रार्थनेने सुरुवात करून येथील दिव्यांग बांधव दैनंदिन जीवन सुसह्यपणे जगत असल्याचे सांगण्यात आले. काजू उदयोग हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. दिव्यांग असून देखील त्यांची शैक्षणिक प्रगती नसली तरी प्रत्येकाला कुवतीप्रमाणे काम मिळावे व प्रत्येकाने स्वावलंबीपणे व दुःख विसरून आनंदात जगावे, हे एकच ध्येय महिला शिक्षिकांना या संस्थेत जवळून पाहावयास मिळाले. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ महिला सेलचा हा माणसातील माणुसकी जपण्याचा उपक्रम खऱ्या अर्थाने सार्थ ठरला. ''हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे'' असे म्हणत या दिव्यांग बांधवांच्या पाठीशी सदैव उभे राहण्याची ग्वाही सर्व महिलांनी दिली.
या अनोख्या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ राज्य कोषाध्यक्षा विनयश्री पेडणेकर, जिल्हाध्यक्ष राजाराम कविटकर, जिल्हा सरचिटणीस भिवा सावंत, श्री. शेडगे, जिल्हा कार्यकारिणी अरुणा घाटकर व स्वप्नाली सावंत, कुडाळ तालुकाध्यक्ष श्री. वारंग, अर्चना देसाई, शुभांगी आचरेकर, कुडाळ महिला सेल अध्यक्षा प्रणाली कविटकर व सहसचिव साक्षी तुळसुलकर, पूजा कविटकर, प्रेरणा वारंग, मनाली बांदेकर, श्रद्धा शेडगे, श्री. तुळसुलकर, श्री. गोसावी व समस्त अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ महिला सेल उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी गोसावी यांनी केले. आभार गौरी वेर्लेकर यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com