कर्जमाफी द्या, सातबारा कोरे करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्जमाफी द्या, सातबारा कोरे करा
कर्जमाफी द्या, सातबारा कोरे करा

कर्जमाफी द्या, सातबारा कोरे करा

sakal_logo
By

88997
सिंधुदुर्गनगरी ः विविध मागण्यांसंदर्भात बागायतदार शेतकऱ्यांनी मंगळवारी उपोषण सुरू केले.


कर्जमाफी द्या, सातबारा कोरे करा

फळबागायतदारांची मागणी; सिंधुदुर्गनगरीत बेमुदत उपोषण

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १४ ः महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती सन्मान योजनेंतर्गत २ लाखांवरील कर्जदार शेतकऱ्यांना तसेच खावटी कर्जदार शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी मिळावी, शेतकऱ्यांचे सातबारा कोरे करावेत आदी मागण्यांसाठी जिल्ह्यातील आंबा, काजू, फळपीक उत्पादक बागायतदार शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले.
सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांकडून आपल्या कर्जमाफीच्या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलन करून निवेदन देऊन शासनाचे लक्ष वेधले; मात्र शासनाकडून त्याची दाखल घेतलेली नाही. आज पुन्हा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले.
जिल्ह्यातील बदलत्या वातावरणामुळे आंबा, काजू हंगामामध्ये फळांवर फळमाशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. दिलेल्या पीक विम्याच्या नुकसान भरपाईत सुद्धा शेतकऱ्यांचे नुकसान भरून येणार नाही, एवढे मोठे संकट बागायतदार शेतकऱ्यांवर आले. त्यावेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे शेतकऱ्यांना हेक्‍टरी एक लाख रुपये मदत द्यावी, अशी मागणी केली होती; मात्र शासन स्तरावरून त्याबाबत काहीच कार्यवाही झाली नाही. जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदार शेतकरी संघटनेच्या वतीने शासनस्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करून तसेच आंदोलन, उपोषण छेडून सुद्धा खावटी कर्जदारांना व दोन लाखांवरील कर्जदारांना अद्यापपर्यंत न्याय मिळालेला नाही, अशी खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. श्यामसुंदर राय, कृष्णा चिचकर, महेश चव्हाण, प्रकाश वारंग, आग्नेय फर्नांडिस, राघोबा नाईक, बाळा नाईक आदी शेतकऱ्यांचा उपोषणकर्त्यांमध्ये समावेश आहे.
---
उपोषणकर्त्यांच्या काही मागण्या
महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेमधील २०१४ ते २०१९ मधील २ लाखांवरील कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी. २०१४ पासून खावटी कर्जदार कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असून त्यांना तातडीने कर्जमाफी मिळावी. अल्पभूधारक व मध्यम मुदतीची कर्जे कोविड काळात भरता आली नाहीत, यावर कर्जमाफी मिळावी. शेतकऱ्यांचे सातबारा कोरे करावेत. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करावे आदी मागण्यांकडे उपोषणाद्वारे लक्ष वेधले आहे.