
संपकरी कर्मचाऱ्यांची कणकवलीत निदर्शने
८९०६४
संपकरी कर्मचाऱ्यांची
कणकवलीत निदर्शने
जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी
कणकवली, ता. १४ : जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आज मंगळवारपासून संप पुकारला. या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी आज पंचायत समिती कार्यालयाबाहेर येऊन जोरदार घोषणाबाजी केली.
राज्य शासकीय कर्मचारी संपामध्ये जिल्ह्यातील बहुतांश कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे पंचायत समिती, तहसील कार्यालय, नगरपंचायत, प्राथमिक शाळांमध्ये आज शुकशुकाट होता. दरम्यान, सकाळी अकराला पंचायत समिती कार्यालयाबाहेर संपकरी कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना अध्यक्ष मनोज कुमार चव्हाण, उपाध्यक्षा नीलम जाधव, सचिव आनंद जाधव यांच्यासह २८ कर्मचारी तर परिचारिका संघटना अध्यक्षा आश्लेषा कदम यांच्यासह ३० परिचारिका निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते.