
पांगम, साळगावकर यांचे पखवाद वादन परीक्षेत यश
89212
आकाश साळगावकर, सचिन पांगम
पांगम, साळगावकर यांचे
पखवाद वादन परीक्षेत यश
सावंतवाडी, ता. १५ ः तालविश्व संगीत विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय गंधर्व मंडळाच्या पखवाज परीक्षेत विशारद पदवी मिळविली. आरोस येथील सचिन पांगम व तुळस येथील आकाश साळगावकर यांनी हे यश मिळविले. या वादकांना तालविश्व संगीत विद्यालयाचे संचालक मनीष तांबोसकर व चिंतामणी संगीत विद्यालयाचे संचालक नीलेश पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
आकाश याने लहानपणापासूनच पखवाज वादनाचे धडे घेण्यास सुरुवात केली. घरातच भजनी परंपरेचा वारसा असून त्याने विविध तालुका व जिल्हास्तरीय भजन स्पर्धांमधून अनेक बक्षिसे मिळवित शास्त्रीय पखवाज वादनात आपला ठसा उमटविला आहे. सचिन पांगम याने घरातील भजनी परंपरा सुरू ठेवताना बालवयातच पखवाज वादनात लौकिक मिळविला. तालुका तसेचजिल्हास्तरीय भजन स्पर्धांमध्ये त्याने अनेक बक्षिसे मिळवून आपल्या कलेची चुणुक दाखविली आहे. दोघेही नामवंत भजनी बुवांना भजन स्पर्धा व कार्यक्रमांत पखवाज साथ संगत, जुगलबंदी, सोलो अशा शास्त्रोक्त कार्यक्रमांमध्ये यशस्वी सहभाग घेत आहेत. आईवडील आणि गुरुंमुळेच हे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. चिंतामणी संगीत विद्यालयाचे संचालक गुरु नीलेश पेडणेकर, माऊली संगीत विद्यालयाचे संचालक वैभव परब व सद्गुरू संगीत विद्यालयाचे संचालक दीप्तेश मेस्त्री यांनी दोघांचे अभिनंदन केले.