कोकणातील नाथ संप्रदाय

कोकणातील नाथ संप्रदाय

rat१५१३.txt

९ मार्च टुडे पान चार

जनरिती-भाती ..........लोगो

- rat१५p७.jpg ः
८९२०१
डॉ. विकास शंकर पाटील

भारत आणि भारताबाहेरही पोहोचलेला संप्रदाय म्हणून नाथ संप्रदायाला ओळखले जाते. हा खूपच जुना संप्रदाय म्हणून ओळखला जातो. कोकणात या संप्रदायाच्या पाऊलखुणा अनेक दंतकथांतून दिसून येतात. कोकणात या संप्रदायाचा प्रसार झाल्याचे दिसते. आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ अशी या संप्रदायाची शिष्य परंपरा सांगितली जाते. कोकणातील अनेक डोंगरांना सिद्धाचा डोंगर असे संबोधले जाते. काही कड्यावर सिद्धपुरुष तपश्चर्या करत होता अशा काही कड्यांना सिद्धनाथाचा डोंगर असेही संबोधले जाते. यातूनच कोकणात नाथ संप्रदायाच्या अस्तित्वाच्या खुणा दिसून येतात.
--

कोकणात नाथ संप्रदायाच्या अस्तित्व खुणा

नाथ संप्रदायातील आदिनाथ म्हणजेच भगवान शंकर असे मानले जाते. कोकणात शिव आराधना ही प्राचीन काळापासून अस्तित्वात असल्याचे दिसते. त्यातूनच येथे नाथ संप्रदाय रूजत गेला असावा, अशी शक्यता अभ्यासकांना वाटते. मालू कवीने आपल्या ''नवनाथ कथासार'' या ग्रंथात कुडाळ प्रांताचा उल्लेख केला आहे. यातील एका अध्यायात कुडाळ प्रांतात अडूळ गावाजवळ मच्छिंद्रनाथ आणि कालिकादेवी यांच्यातील युद्ध वर्णन केले आहे. भगवान शंकराच्या हातामध्ये कालिका अस्त्र होते. या कालिका अस्त्रास आज्ञा करून भगवान शंकराने अनेक दैत्यांचा वध केला होता. त्यामुळे भगवान शंकरांनी कालिका अस्त्रास हवा तो वर मागण्यास सांगितले. हे अस्त्र म्हणजे कालिका देवीच होती. तेव्हा कष्टलेल्या या कालिका देवीने भगवान शंकरांना विनंती केली की, मला आता काही काळ विश्रांती द्यावी. देवाने ही विनंती मान्य केली. मला कुणीही सुप्तावस्थेतून उठवू नये, अशा जागी ठेवण्याचा वर तिने शंकराकडून घेतला होता. तेव्हा देवी अडूळ (सध्याचे आंबडपाल) गावाबाहेरील दुर्गा मंदिराच्या परिसरातील कणकाच्या बेटात विश्रांती घेत होती.
भगवान शंकराचे पुत्र कार्तिकेयांचे स्थान कोकणात आहे. त्या स्थानाला भेट देण्यासाठी मच्छिंद्रनाथ या परिसरात आले. भगवान शंकराच्या हातात असणाऱ्या कालिकास्त्रास आव्हान करावे आणि भक्तीने कालिकादेवीस प्रसन्न करून घ्यावे म्हणून मच्छिंद्रनाथांनी तिची आराधना सुरू केली. विश्रांती घेत असणाऱ्या देवीस हे खटकले. ती संतापली आणि तिने मच्छिंद्रनाथास युद्धाचे आव्हान दिले. मच्छिंद्रनाथांनी तिची विनवणी करण्याचा प्रयत्न केला; पण संतापलेल्या देवीने मच्छिंद्रनाथांवर विविध अस्त्रांचा प्रयोग केला. देवीने सोडलेल्या साऱ्या अस्त्रांचा मच्छिंद्रनाथांनी उत्तम प्रतिकार केला. शेवटी देवी मूर्च्छित पडली त्या वेळी भगवान शंकर प्रकट झाले. त्यांनी देवीला शुद्धीवर आणले. मच्छिंद्रनाथांना प्रसन्न होऊन शंकराने देवीस मच्छिंद्रनाथांना त्यांच्या जनउद्धाराच्या कार्यात सहभागी होण्यास सांगितले. देवीने ते मान्य केले. हा युद्ध झालेला डोंगर आजही देवाचा डोंगर म्हणून ओळखला जातो. तेथे मच्छिंद्रनाथ आणि कालिका देवीची आजही पूजा केली जाते.
अलीकडे कोकण रेल्वे मार्ग बनवत असताना या डोंगरातून हा मार्ग काढला गेला होता. देवाच्या डोंगरावर काम करत असताना मार्गात सदैव अडथळे येऊ लागले. नाथांची ही तपोभूमी असल्यामुळेच इथे असे अडथळे येत राहतील. इथे काही मोडतोड केल्यास अनर्थ होत राहील. त्यामुळे इथे कोणतेही काम होऊ नये, अशी येथील लोकांकडून अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यामुळे या मार्गात थोडासा बदल केला. त्या वेळी मार्ग सुरळीतपणे बनला, असे येथील लोकांकडून सांगितले जाते. त्यामुळे मच्छिंद्रनाथाच्या तपोभूमीशी येथील लोकसंस्कृतीचे भक्तीभावनेचे, श्रद्धेचे नाते आजही टिकून असल्याचे दिसते. सावंतवाडीजवळील बांदे गावी राहून कोकणातून भारतभर नाथ संप्रदायाची पताका घेऊन जाणारे सोहिरोबानाथ आंबिये हे थोर नाथ संप्रदायी संत होते. सोहिरोबा गोव्यातील पेडणे येथून बांदे येथे राहू लागले. त्यांचा बराच वेळ देवपूजा, धर्मग्रंथांचे वाचन व काही पदरचना यात जाऊ लागला. पूर्वजन्मीची योगसाधना, या जन्मीची भक्तीसाधना यांच्या समागमाने हळूहळू असामान्याकडे त्यांची वाटचाल होऊ लागली. संतत्व उदयास येऊ लागले. काही सिद्धीही त्यांच्यापुढे सेवेस सिद्ध झाल्या. सावंतवाडी संस्थानच्या गादीवर त्या वेळी तिसरे खेमसावंत हे पराक्रमी व सात्विक राजे राज्य करत होते; परंतु त्यांचे चुलते सोम सावंत उर्फ आबा सावंत यांचे प्रस्थ अधिक होते. ते मद्य पित व इतरांना त्रास देत असल्याने सर्वांना त्रस्त करून सोडत. सोहिरोबांची किर्ती त्यांच्या कानावर आली होती. त्यांनी नाथांना देव दाखवायला सांगितले. क्षणभर डोळे मिटून नाथांनी प्रार्थना केली. आत्मतेजाचा साक्षात्कार झाला. नाथ उत्तरले, ‘महाराज, तो पहा देव.’ वाड्याच्या भिंतीतून अग्निज्वाला प्रकट झाली व पुढे आबासाहेबांनी दारूच्या पिंपावर बसून आग लावून आत्महत्या केली. सावंतवाडी संस्थानातून निरोप आल्यावर आईकडून फणस घेऊन सोयरोबा सावंतवाडीकडे जात होते. वाटेत त्यांनी तो फणस फोडला. ते गरे खाणार एवढ्यात जंगलातून आवाज आला. गहिनीनाथ प्रकट झाले आणि त्यांनी सोयरोबा नाथांना अनुग्रह दिला. त्यानंतर ते विरक्त झाले आणि भक्तांचा उद्धार करू लागले. पुढे त्यांनी बांदे सोडून करवीर नगरीत प्रवेश केला. तिथून पुढे ते इतर प्रदेशात प्रवेश करत राहिले. त्यांनी बांदे प्रांतात सुरू केलेली नाथ संप्रदायाची परंपरा आजही लोकप्रिय असल्याचे दिसते. कोकणात कुडाळ शहर, आंबडपाल, पाट, आंदुर्ले आदी गावांचा उल्लेख नवनाथ कथासारमध्ये आल्याचे दिसते. अशाप्रकारे कोकणात नाथ संप्रदायाच्या खुणा या प्राचीन काळापासूनच दिसतात. या संप्रदायाविषयीची आस्था आणि भक्तीभावना येथील लोकांमध्ये दिसून येते.

(लेखक महाविद्यालयाचे मराठीचे प्राध्यापक आहेत.)
--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com