रेडी, शिरोडासाठी
पाच कोटी मंजूर

रेडी, शिरोडासाठी पाच कोटी मंजूर

रेडी, शिरोडासाठी
पाच कोटी मंजूर
सावंतवा़डी ः रेडी-यशवंतगड व शिरोडा वेळागर बंधार्‍यासाठी प्रत्येकी ५ कोटी मंजूर झाले असून त्यापैकी २०२३-२४ साठी प्रत्येकी १.९० कोटीची तरतूद केली आहे. आपत्ती सौम्यीकरण अंतर्गत दोन्ही कामे प्रस्तावित असल्याची माहिती जिल्हा परिषदचे माजी सभापती प्रीतेश राऊळ यांनी दिली. रेडी यशवंतगड व शिरोडा वेळागर येथे पावसाळ्यात समुद्राचे पाणी वस्तीत घुसत होते. तसेच जमिनीची धूप होऊन माडबागायतीचे बरेच नुकसान होत होते. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी धूप प्रतिबंधक बंधारा होणे फारच गरजेचे होते. त्यासाठी या दोन्ही बंधाऱ्यासाठी केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार नीलेश राणे यांच्या प्रयत्नातून या दोन्ही बंधाऱ्यांना प्रत्येकी ५ कोटी मंजूर झाले असून यासाठी आपण पाठपुरावा केला असल्याचे राऊळ यांनी स्पष्ट केले.
--
मूर्तिकारांची उद्या
कुडाळमध्ये सभा
सावंतवाडी ः श्री गणेश मूर्तिकार संघातर्फे शुक्रवारी (ता. १७) सकाळी साडेदहाला कुडाळ येथील रविकिरण हॉल (बसस्थानकासमोर) येथे मूर्तिकारांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस मूर्ती घडविणारे मूर्तिकार तसेच गेल्या तीन वर्षांत स्पर्धेत भाग घेतलेले मूर्तिकार, स्पर्धेत भाग न घेतलेले पण कोर्स केलेल्या होतकरू मूर्तिकारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. मातीच्या मूर्तीची मागणी येत आहे; पण सिंधुदुर्ग पॅटर्न असावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यासंदर्भात बैठकीत विचारविनिमय होणार आहे. जिल्ह्यातील मूर्तिकारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री गणेश मूर्तिकार संघाने केले आहे.
---
कुडासे नदीत
गाळ उपसा
दोडामार्ग ः कुडासे वडाचे देवने येथे नदीतील गाळ उपसण्याचे काम ग्रामपंचायत सदस्य राजाराम देसाई यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सुरू करण्यात आले. या प्रसंगी उपसरपंच आत्माराम देसाई, ग्रामपंचायत सदस्य प्रसाद कुडास्कर, बाबी उर्फ दादा देसाई, रामदास मेस्त्री, विजय जाधव, राजाराम देसाई उपस्थित होते. बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी या नदीतील गाळ काढण्यासाठी विशेष पाठपुरावा केला. त्या अनुषंगाने कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांनी दखल घेत गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. ग्रामस्थांनी गवस व कोरे यांचे आभार मानले.
--------------
कणकवली येथे
विविध कार्यक्रम
कणकवली ः येथील श्री ब्राह्मणदेव मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव शनिवारी (ता. १८) विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. सकाळी सातला नित्यपूजा, दहाला ‘श्रीं’ची महापूजा, दुपारी बाराला आरती व तीर्थप्रसाद, एकला महाप्रसाद, तीनला ढोल-ताशांचा गजर, सायंकाळी पाचला स्थानिक भजने, रात्री सातला गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, किर्लोस-गोठवणवाडी यांचे वारकरी भजन, आठला स्वरनिर्मित कराओके मैफिल, रात्री दहाला पार्सेकर दशावतारी नाट्यमंडळ वेंगुर्ले यांचा पौराणिक नाटक सादर होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com