
कणकवली : गाबीत महोत्सव माहिती
८९५०९
गाबीत महोत्सवाला दीड लाखांची उपस्थिती
परशुराम उपरकर : २४ मार्चला धुरीवाडा येथील बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन
कणकवली, ता.१६ : मालवण येथील दांडी किनाऱ्यावर २७ ते ३० एप्रिल या दरम्यान गाबीत महोत्सव होत आहे. या महोत्सवाला राज्य आणि राज्याबाहेरील गाबीत बांधव आणि पर्यटक असे दीड लाख जणांची उपस्थिती असेल अशी माहिती अखिल भारतीय गाबीत महासंघ अध्यक्ष परशुराम उपरकर आणि जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर यांनी आज दिली. तसेच या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर २४ मार्च रोजी मालवण धुरीवाडा येथे बैठक होणार आहे. या बैठकीला गाबीत बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केली.
परशुराम उपरकर म्हणाले, ‘‘महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक आणि गुजराथ राज्याच्या किनारपट्टी भागात गाबीत समाज बाधंवांची वस्ती मोठ्या प्रमाणावर आहे. छत्रपती शिवरायांच्या काळात आरमारामध्ये सैनिक असेलल्या या समाजाने नंतर उदरनिर्वाहासाठी मच्छीमारी व्यवसाय स्वीकारला. या समाजाला एका छत्राखाली एकाच व्यासपीठावर एकत्र करुन गाबीत महोत्सव साजरा केला जाणार आहे.’’
चंद्रशेखर उपरकर म्हणाले, ‘‘गाबीत महोत्सवामध्ये मत्स्य पदार्थांची रेलचेल, तसेच मालवणी पारंपारिक खाद्य पदार्थ तसेच पारंपारिक मच्छिमारांची प्रात्यक्षिके, रोजगार प्रशिक्षण, पर्यटन परिसंवाद, पाककला स्पर्धा, सागरी सुंदरी स्पर्धा, नौकानयन, पोहोण्याची स्पर्धा, आणि क्रिकेट स्पर्धा होणार आहेत.’’
महोत्सवाच्या अनुषंगाने २४ मार्चला होणाऱ्या बैठकीला समाजातील सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी, आजी माजी सरपंच, पंचायत समिती सदस्य, जि. प. सदस्य, संस्था प्रतिनिधी, नागरिक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन परशूराम उपरकर व चंद्रशेखर उपरकर यांनी केले आहे.