
संपकरी कर्मचाऱ्यांना बजावणार नोटिसा
पान एक
संपकरी कर्मचाऱ्यांना बजावणार नोटिसा
सीईओंचे आदेश; शिस्तभंगाची कारवाई का करू नये?
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १६ ः जुनी पेन्शन मिळावी, या मागणीसाठी संपात उतरलेल्या कर्मचाऱ्यांना आपल्यावर शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये याचा खुलासा करावा, अशा नोटिसा देण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने खाते प्रमुखांना दिले आहेत.
शासकीय कर्मचाऱ्यांनी १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे. संपात ९८ टक्के कर्मचारी सहभागी झाले आहेत. कर्मचाऱ्यांकडून जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलनही सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झालेल्या परिपत्रकानुसार शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत केंद्राचे ‘काम नाही वेतन नाही’ हे धोरण राज्य शासनही अनुसरत असल्याने जे कर्मचारी संपामध्ये सहभागी झाले आहेत, अशा कर्मचाऱ्यांच्या सेवेमध्ये खंड पडू शकतो. याची जाणीव करून देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने संपात उतरलेल्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली आहे. या नोटिसीमध्ये जे कर्मचारी २००५ पूर्वी सेवेत दाखल झाले आहेत आणि जुनी पेन्शनचे लाभार्थी आहेत, अशा कर्मचाऱ्यांना आपणास निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन देय असूनदेखील आपण बेमुदत संपामध्ये सहभागी झाला आहात. त्यामुळे आपण केलेली कृती अशोभनीय असून महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील तरतुदीचा भंग करणारी आहे. त्यामुळे आपले संप कालावधीचे वेतन कपात करण्यात येणार आहे. यास्तव आपणाविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, याचा खुलासा कार्यालयात समक्ष उपस्थित राहून करावा; अन्यथा योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस संबंधित खातेप्रमुखांमार्फत बजावली आहे. २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना ‘काम नाही तर वेतन नाही’ या धोरणानुसार आपल्या सेवेमध्ये खंड पडू शकतो, याची नोंद घ्यावी. संपात सहभागी होऊन आपण केलेली कृती ही अशोभनीय असून आपणाविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, याचा खुलासा करावा; अन्यथा कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस बजावण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने आज देण्यात आली.
संपकरी कर्मचाऱ्यांना पूर्वसूचना म्हणून खातेप्रमुखामार्फत नोटिसा बजावल्या आहेत. यात आरोग्य विभागातील ३०३ कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. आरोग्य विभागात एकूण ३९३ कर्मचारी असून ३१ कर्मचारी अधिकृत रजेवर आहेत. ३३० कर्मचारी प्रत्यक्षात संपात उतरले आहेत. शिक्षण विभागाकडून माहिती घेतली असता जिल्ह्यात कार्यरत असलेल्या १३८६ शाळांमध्ये ३४६६ शिक्षक कार्यरत असून त्यापैकी १०८ शिक्षक दीर्घ मुदतीच्या रजेवर आहेत. ३२४३ शिक्षक संपात सहभागी आहेत. प्रत्यक्षात ११५ शिक्षक कर्मचारी सद्यस्थितीत शाळेत कार्यरत आहेत. जिल्ह्यातील एकूण १३८६ शाळांपैकी केवळ ७९ एवढ्या शाळा सुरू आहेत. तर उर्वरित सर्व शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. याबाबत संपात उतरलेल्या शिक्षकांना गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत नोटिसा बजावल्या आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी दिली.
दृष्टिक्षेपात
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद
एकूण कर्मचारी ४७७५
२२३ कर्मचारी दीर्घ मुदतीच्या रजेवर
२३३ कर्मचारी कार्यालयात उपस्थित
४३५१ कर्मचारी प्रत्यक्ष संपावर