ऋषिवर्य धोंडो केशव कर्वे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऋषिवर्य धोंडो केशव कर्वे
ऋषिवर्य धोंडो केशव कर्वे

ऋषिवर्य धोंडो केशव कर्वे

sakal_logo
By

इये साहित्याचिये नगरी ..........लोगो

८९६१८
धोंडो केशव कर्वे

८९६४८
प्रकाश देशपांडे
-------------

ऋषिवर्य धोंडो केशव कर्वे

लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या बरोबर १८८५ ला फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना केली. लोकमान्य या महाविद्यालयात गणित विषय शिकवत असत; पण राजकारणातल्या धावपळीत शिकवणे अवघड झाले आणि लोकमान्यांनी १८९१ ला गणिताचे प्राध्यापक म्हणून धोंडो केशव कर्वे यांची नियुक्ती केली. ज्यांनी स्त्री शिक्षणाचा ध्यास घेऊन आपले उभे आयुष्य कर्मयोगाचा आदर्श म्हणून समाजासमोर ठेवले.
या ऋषितुल्य युगपुरुषाचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात शेरवली गावी झाला. यांचे मूळ गाव मुरूड. घरची अत्यंत गरिबी होती. प्राथमिक शिक्षण मुरूडला झाल्यानंतर इंग्रजी शिक्षणासाठी रत्नागिरीच्या सरकारी हायस्कूलमध्ये आले. मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुंबर्इला विल्सन कॉलेजमधून गणित विषय घेऊन पदवी प्राप्त केली.
गरिबी असल्यामुळे शिष्यवृत्तीच्या मिळणाऱ्या ८ रुपयांतून ४ रुपये वाचवून ते घरी मुरूडला वडिलांना पाठवत. शिकत असतानाच तत्कालीन प्रथेप्रमाणे त्यांचा विवाह झाला. पत्नीचे नाव राधाबार्इ. एक अपत्य झाल्यानंतर राधाबार्इंचे निधन झाले. जे अपत्य जन्माला आले त्यानेही आपले नाव देशभर गाजवले. ते रघुनाथराव कर्वे. ज्यांनी भारतात कुटुंब नियोजनाच्या कार्याचा प्रारंभ केला.
धोंडो केशवांना सारेजण अण्णा या नावाने ओळखत. विधुर अण्णांनी दुसरा विवाह करावा यासाठी विचारणा सुरू झाली. त्या वेळी अवेळी अण्णांचे वय होते ४५. या वयात एखाद्या १२ ते १४ वर्षाच्या मुलीशी विवाह करणे अण्णांना पटणारे नव्हते. अण्णा मुंबर्इला त्यांचे मित्र नरहरपंत जोशी यांच्या घरी राहात. नरहरपंत देवरूखचे. त्यांच्या तिन्ही भगिनी बालविधवा होऊन परत आलेल्या होत्या. अण्णांनी नरहरपंतांची भगिनी गोदावरी हिच्याशी ११ मार्च १८९३ ला विवाह केला. विधवेशी विवाह केल्याने मुरूडमधल्या ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला. अण्णा सपत्नीक मुरूडला आले तेव्हा ग्रामस्थांनी ‘या पती-पत्नीला घरात घेतले तर तुमच्यावर ग्रामण्य टाकू’ अशी धमकी दिली. कर्मयोगी अण्णांनी शांतपणे घरात न जाता गुरांच्या गोठ्यात वास्तव्य केले. मुरूडला जरी विरोध झाला तरी पुण्यात जसे विरोधक होते तसे समर्थकही होते. अण्णांच्या विवाह निमंत्रणावर स्वतः गोपाळराव आगरकरांची स्वाक्षरी होती. लोकमान्यांनीही केसरीतून या विवाहाचे समर्थन केले होते.
समाजात विधवांचे होणारे हाल, त्यांचे केशवपन भीषण होते. त्या काळात बालविधवांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. वयाच्या १२ ते १४ वयात वैधव्य असल्यानंतर सासरी अगर माहेरी केवळ कष्टाचे जिणे असायचे. दोन्ही घरची परिस्थिती गरिबीची असली तर या सोवळ्या स्त्रिया घरोघरी स्वयंपाक करून उदरनिर्वाह करायच्या. १८९३ च्या दरम्यान तर सतीबंदीचा कायदाही आला नव्हता. अनेक माता-भगिनींना जिवंतपणी सरणावर जाळून घ्यावे लागे.
अण्णांनी यापुढे असे अन्याय अत्याचार होऊ नयेत, स्त्रियांना सन्मानाचे जगणे मिळावे यासाठी विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली. समाजातील बालविधवांसाठी अण्णांनी १८९६ ला अशा सहा बालविधवा घेऊन अनाथ बालिकाश्रम स्थापन केला. या वेळी आठवण येते ती मुस्लिम सत्यशोधक हमीदभाईंची. अण्णांनी १८९६ ला स्त्रियांच्यावर होणाऱ्या अन्यायाला विरोध करून अनाथ महिलाश्रम सुरू केला. हमीदभार्इंना सात महिला घेऊन ७० वर्षानंतर १९६६ ला मोर्चा काढावा लागला होता. अण्णांच्या या मोहिमेला परंपरावाद्यांचा विरोध होता; पण समाजातील सुसंस्कृत पुरोगामी समाज समर्थनार्थ पुढे येत होता. पुण्यातील एक प्रतिष्ठित रावबहादूर गणेश गोविंद गोखले यांनी आपली हिंगणे गावातील सहा एकर जागा या कार्याला दिली. आज ज्याला कर्वे रोड म्हणून ओळखले जाते तो भाग म्हणजे हिंगणे गाव. अण्णांनी तिथे एक झोपडी बांधून कार्यारंभ केला. पुढे त्याचेच रूपांतर हिंगणे स्त्री शिक्षा संस्थेत झाले अर्थात् हे सहजसाध्य नव्हते. अण्णा त्या वेळी फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक होते. हिंगण्याच्या आश्रमापासून हे अंतर सहा मैल होते. अण्णा रोज चालत जात. संस्था सुरू होताच त्यांनी आपली शिल्लक रक्कम १ हजार रुपये संस्थेला देऊन टाकली. आश्रमातील मुलींसाठी पती-पत्नी माधुकरी मागत. निष्काम कर्मयोगाचे हे आदर्श उदाहरण.
१९०७ ला स्त्रियांना उपयोगी शिक्षण मिळावे म्हणून महिला विद्यालयाची स्थापना केली. १९१५ ला अण्णांना जपानमधील महिला विद्यापिठाची माहिती समजली. त्यांनी निश्‍चय केला, भारतात आपणही महिला विद्यापीठ स्थापन करायचे. कर्मधर्म संयोगाने अण्णांना राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्षस्थान मिळाले. अण्णांनी या पदाचा उपायोग करून महिलांसाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे आणि या विद्यापिठातून मातृभाषेत शिक्षण दिले जावे, हा विचार मांडला. उपस्थितांनी तो उचलून धरला. १९१६ ला पहिल्या महिला विद्यापिठाची निर्मिती झाली. या पहिल्या महिला विद्यापिठाचे कुलगुरूपद थोर विचारवंत रा. गो. भांडारकर यांनी तर प्राचार्यपद अण्णांनी भूषवले. त्यांच्या या उपक्रमाला अनेक मान्यवरांनी सहकार्य केले. पुढे सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी १५ लक्ष रुपयांची देणगी दिली आणि महाविद्यालयाला ठाकरसींच्या मातोश्री ‘श्रीमती नाथीबार्इ दामोदर ठाकरसी महाविद्यालय'' असे नाव देण्यात आले. ‘आपुल्या ध्येयावरी असुदे दृष्टी तुझी रे पुरी’ या काव्यपंक्तीप्रमाणे आयुष्यभर अण्णा झिजले. संस्थेला देणग्या मिळवण्यासाठी पायी वणवण केली तर कधी परदेशवारीही केली. युरोप, आफ्र्रिका खंडात हिंडून देणग्या मिळवल्या.
१९४२ ला या विद्यापिठाला केंद्र सरकारची मान्यता मिळाली. अण्णांच्या कार्याचा सन्मान म्हणून १९५५ ला भारत सरकारने ’पन्नभूषण‘ आणि १९५८ ला ‘भारतरत्न’ ही सर्वोच्च पदवी प्रदान केली. पंडित नेहरूंनी ‘कर्वे एखाद्या ऋषीमुनींप्रमाणे वाटतात’ असे म्हटले होते. आपल्या सर्व संस्था अण्णांना प्राणाहून प्रिय होत्या. त्यांनी एका ठिकाणी म्हटलंय ‘मला माझ्या संस्था माझ्या आप्ताहून व प्राणाहूनही प्रिय वाटतात. अण्णांनी १९२२ ला आपले आत्मचरित्र ‘आत्मवृत्त’ म्हणून लिहिले. आजकाल सर्व राजकीय नेत्यांना शिष्टाचाराचे नको इतके महत्व वाटू लागले आहे. निमंत्रण व कार्यक्रम पत्रिकेत आपले नाव जरा खाली वर झाले तर त्याचा जीव खालीवर होतो; पण मोठी माणसे सर्वार्थानेच मोठी असतात.
ज्या फर्ग्युसन महाविद्याल्यात अण्णा प्राध्यापक होते त्या फर्ग्युसनचा अमृत महोत्सव १९५९ ला मोठ्या उत्साहात पार पडल्या. महोत्सवाला अध्यक्ष होते राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद. व्यासपिठावर बाबू राजेंद्रप्रसाद स्थानापन्न झाले. समोर बसलेल्या श्रोतृगणाकडे त्यांनी दृष्टिक्षेप टाकला. पहिल्या रांगेत बसले होते धोंडो केशव कर्वे. राजेंद्रप्रसाद उठले. व्यासपिठावरून खाली आले आणि अण्णांना खाली वाकून नम्रपणाने नमस्कार केला. तथाकथित प्रोटोकॉलमध्ये हे बसत नव्हते; मात्र राष्ट्रपतींना या ऋषींसमोर शिष्टाचार महत्वाचा वाटला नाही. मला वाटते हे असे एकमेव उदाहरण असावे. अण्णांना दीर्घायुष्य लाभले. ते १०३ वर्षे जगले. अनाथ बालिकांपासून महिलांच्या सबलीकरणाचा प्रवास त्यांना याची देही याची डोळा अनुभवता आला. ९ नोव्हेंबर १९६२ ला देहावसान झाले.

(लेखक इतिहासाचे गाढे अभ्यासक आणि साहित्यिक आहेत.)