
प्रेमजीभाई आसर विद्यालयात ''क्षेत्रभेट'' उपक्रम
८९६४२
प्रेमजीभाई आसर विद्यालयात ''क्षेत्रभेट'' उपक्रम
चिपळूण, ता. १७ ः शहरातील प्रेमजीभाई आसर प्राथमिक शाळेत १७ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत परिसर अभ्यास विषयांतर्गत ''क्षेत्रभेट'' हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.
शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता नाईक यांच्या मार्गदर्शनानुसार चौथीचे वर्गशिक्षक व विषयशिक्षक यांनी याचे नियोजन केले होते. शाळेच्या तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीत मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी प्रयत्न केले. या वेळी प्रमोद ठसाळे यांनी पालिकेतील सर्व विभागाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी विशेष नियोजन केले. त्यामुळे पाणीपुरवठा विभाग, करवसुली विभाग, आरोग्य विभाग, नागरी सुविधा केंद्र इ. विभागाची उत्तम माहिती मिळाली. यानंतर गेलेल्या चिपळूण मुख्य पोस्टऑफिसच्या क्षेत्रभेटीच्यावेळी पोस्टमास्तर पानवलकर व कर्मचारी सचिन कदम व अंकिता चांदिवडे यांनी विद्यार्थ्यांना पोस्टात असणाऱ्या सुविधा तसेच प्रत्यक्ष पोस्टाचे कामकाज कसे चालते व्यवहार कसे करावे याची माहिती दिली.
पत्रांचे प्रकार, स्पीडपोस्ट, मनीऑर्डर, कुरिअर सेवा तसेच सुकन्या योजना, ऑनलाईन व्यवहार कसे चालतात हे प्रत्यक्षदर्शी दाखवले. चिपळूण पोलिस ठाणे येथे गेलेल्या क्षेत्रभेटीच्यावेळी तेथील महिला पोलिस हेडकॉन्स्टेबल वैदेही सकपाळ यांनी विद्यार्थ्यांना पोलिसयंत्रणा कशी २४ तास कार्यरत असते हे सांगितले. पोलिस हाताळत असलेली शस्त्रे व त्याचा वापर कधी व कोठे कसा करायचा हे सांगितले. विद्यार्थ्यांना या ठिकाणी बालगुन्हेगारी, वाहतुकीचे नियम, स्वतःची सुरक्षितता याची माहिती देण्यात आली. यानंतर चिपळूण शहरातील ॲक्सिस बँकेत गेलेल्या क्षेत्रभेटीच्यावेळी या बँकेचे शाखाधिकारी नितीन पावसकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत बँकेच्या व्यवहाराची माहिती दिली. पैशांचे व्यवहार मशिनद्वारे कसे चालतात हे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना दाखवले. ऑनलाईन सेवा, स्पीड बँकिंग सेवेबद्दल माहिती दिली. बँकेचे व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी, हे सांगितले.