सावंतवाडीतील ‘रक्त आंदोलन’ स्थगित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीतील ‘रक्त आंदोलन’ स्थगित
सावंतवाडीतील ‘रक्त आंदोलन’ स्थगित

सावंतवाडीतील ‘रक्त आंदोलन’ स्थगित

sakal_logo
By

89847
सावंतवाडी ः येथे माहिती देताना देव्या सूर्याजी व पदाधिकारी.

सावंतवाडीतील ‘रक्त आंदोलन’ स्थगित

देव्या सूर्याजी; मनाई आदेशामुळे तूर्त माघार


सावंतवाडी, ता. १८ ः रक्त पिशवीच्या दरात झालेल्या दरवाढीविरोधात प्रशासनाला निवेदन देऊनही दखल न घेतल्याने आज युवा रक्तदाता संघटनेच्यावतीने आयोजित रक्त आंदोलन मनाई आदेशाच्या पार्श्वभूमीवर स्थगित केले. पोलिसांनी नोटीस बजावत कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिल्याने सहभागी तरुणांच्या भवितव्याचा विचार करून तूर्तास हे आंदोलन स्थगित करत आहोत; मात्र मनाई आदेश संपेपर्यंत दरवाढ रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी दिला.
याबाबत दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, रक्त हा मानवी जीवनातील अविभाज्य घटक. रक्ताला कोणता धर्म, जात, रंग, पंथ नसतो. सर्वसामान्यांप्रमाणे पोलिसांनाही आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही रक्त लागते. रक्त पिशव्यांची दरवाढ कमी होत नसेल, तर सरकार असंवेदनशील सरकार आहे, असे म्हणावे लागेल. दरवाढ रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी, मंत्री यांना निवेदन दिली; मात्र त्यावर कोणताही निर्णय न झाल्याने आज ‘रक्त आंदोलन’ जाहीर केले होते; मात्र मनाई आदेशाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नोटीस बजावून कायदेशीर कारवाईचा इशारा दिला. त्यामुळे तूर्तास आंदोलन स्थगित करत आहोत‌. लोकशाहीच्या मार्गाने आवाज उठविणे हा गुन्हा ठरत असेल, तर कोणत्या मार्गाने दाद मागावी, हा प्रश्न निर्माण झाला आहे. यापुढे रक्तदान शिबिर घ्यावी की न घ्यावीत, हे शासनाने सांगावे. त्याचीही जबाबदारी पोलिस, जिल्हा प्रशासनाने घ्यावी. नोटिसा बजावण्यात तत्परता दाखविलेल्या प्रशासनाने दरवाढ रद्द करण्यासाठीही प्रयत्न करावेत. मनाई आदेश उठेपर्यंत दरवाढ रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन उभारू, असा इशारा सूर्याजी यांनी दिला. यावेळी गौतम माठेकर, अर्चित पोकळे, सूरज मठकर आदी उपस्थित होते.