रुग्णांना मदतीचा हात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रुग्णांना मदतीचा हात
रुग्णांना मदतीचा हात

रुग्णांना मदतीचा हात

sakal_logo
By

सदर ः माहितीचा कोपरा

74275

रुग्णांना मदतीचा हात

लीड
जिल्ह्यातील कॅन्सर, किडनी, हृदयरोग अशा दुर्धर आजारांनी पीडित असलेल्या रुग्णांना सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आपल्या स्वनिधीतून आर्थिक मदत करीत आहे. यामुळे जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला संकटकाळी मोठा आधार मिळत आहे. परिपूर्ण प्रस्ताव सादर करणाऱ्या रुग्णाला १५ हजार रुपये एवढी आर्थिक मदत केली जात आहे.
- विनोद दळवी
..................
३ नोव्हेंबर २००६ ला राज्याने आदेश काढत जिल्हा परिषदांना आपापल्या कार्यक्षेत्रातील कॅन्सर, किडनी, हृदयरोग अशा दुर्धर आजारांनी पीडित असलेल्या रुग्णांना आर्थिक मदत करण्याची योजना राबविण्यास कळविले होते. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने २००७-०८ या आर्थिक वर्षापासून दुर्धर आजाराने पीडित असलेल्या नागरिकांना मदत करण्याची योजना सुरू केली. विशेष म्हणजे ही योजना राबविताना आर्थिक उत्पन्न अथवा जातीमध्ये बंदिस्त करण्यात आलेली नाही. कोणत्याही जातीच्या रुग्णाला तसेच दारिद्र्य रेषेखाली नसलेल्या रुग्णाला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. त्यामुळे ही योजना जिल्ह्यातील नागरिकांसाठी अधिक फलदायी ठरत आहे. अलीकडे आजारांची संख्या वाढली आहे. या आजारांवर उपचार करण्यासाठी येणारा खर्च सुद्धा जास्त असतो. त्यात कॅन्सर, किडनी, हृदयरोग हे दुर्धर आजार झाला असल्यास त्यावर उपचार करण्यासाठी येणारा खर्च सर्वसामान्य व्यक्तीला परवडणारा नसतो. त्यामुळे जिल्हा परिषदेने आर्थिक मदत देऊ केलेल्या आजारांत कॅन्सर, किडनी, हृदयरोग या आजारांचा समावेश केला आहे. त्यामुळे एखाद्या रुग्णाला दुर्दैवाने हा आजार झाल्यास आणि त्यावर उपचार करायचा असल्यास किरकोळ प्रमाणात ही होणारी आर्थिक मदत उपयोगी ठरत आहे.

अर्ज कुठे करायचा?
दुर्धर आजार योजनेचा आर्थिक लाभ घेण्यासाठी तालुक्याच्या पंचायत समितीत जाऊन तेथील आरोग्य विभागात रीतसर मागणी करणारा अर्ज करायचा आहे. यासाठी पंचायत समितीत छापील अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा मागणी अर्ज पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेत प्राप्त होणे क्रमप्राप्त आहे. त्यानंतर मदत बँक खात्यात जमा केली जाते.

कोणतीही अट नाही
जिल्हा परिषदेच्या अन्य लाभाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी काही अटी घातलेल्या आहेत; मात्र, दुर्धर आजार योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतीही योजना घातलेली नाही. केवळ संबंधित लाभार्थीने निवडलेल्या आजारावर उपचार घेतलेला आहे का, याची खात्री केली जाते.

आवश्यक कागदपत्रे
योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज सादर करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर उपचार घेतलेल्या खर्चाची पावती जोडणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांच्या नावाचे बँक पासबुक असल्याची झेरॉक्स जोडावी लागते. रुग्ण ज्या गावातील आहे, त्या गावचा रहिवासी असल्याचा सरपंचांचा दाखला जोडणे आवश्यक आहे. ज्या आजारावर लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर केला, तो आजार असल्याचा तज्ज्ञ डॉक्टर अथवा जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच आधार आणि पॅनकार्डची झेरॉक्स प्रत जोडणे गरजेचे आहे.

प्राप्त प्रस्तावांना लाभ
या योजनेसाठी जिल्हा परिषदेने अनुदान तरतुदीत लवचिकता ठेवली आहे. निश्चित अशी तरतूद केली जात नाही. येणाऱ्या सर्व परिपूर्ण प्रस्तावांना लाभ दिला जातो. रक्कम कमी पडत असताना त्यासाठी अजून निधी उपलब्ध केला जातो. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोणत्याही नागरिकाला मदत उपलब्ध होत असल्याने सर्वांना योजनेचा लाभ मिळत आहे.
.................
कोट
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, महिला यांच्या उन्नतीसाठी झटणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या अनेक योजना राबविल्या जात आहेत. त्यातीलच दुर्धर आजाराने पीडित रुग्णाला मदत करणारी ही योजना आहे. गतवर्षी या योजनेंतर्गत जिल्हा परिषदेने २५ लाखांची मदत गरजूंना केली. जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकाला कॅन्सर, किडनी, हृदयरोग हे आजार होऊ नयेत, अशी इच्छा आहे; पण दुर्दैवाने हा आजार कोणाला झाल्यास आर्थिक मदतीसाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे रीतसर परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा.
- डॉ. महेश खलिपे, जिल्हा आरोग्य अधिकारी, सिंधुदुर्ग