सदर ः सागरी जीवांचे व्यवस्थापन, संरक्षणासाठी 10 उद्दिष्टे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सदर ः सागरी जीवांचे व्यवस्थापन, संरक्षणासाठी 10 उद्दिष्टे
सदर ः सागरी जीवांचे व्यवस्थापन, संरक्षणासाठी 10 उद्दिष्टे

सदर ः सागरी जीवांचे व्यवस्थापन, संरक्षणासाठी 10 उद्दिष्टे

sakal_logo
By

सागरमंथन .........लोगो

rat23p5.jpg ः डॉ. स्वप्नजा आ. मोहितेKOP23L90821

इंट्रो

निरोगी महासागर आणि समुद्र आपल्या अस्तित्वासाठी आवश्यक आहेत. ते पृथ्वीचा 70 टक्के भाग व्यापतात आणि आपण अन्न, ऊर्जा आणि पाण्यासाठी त्यांच्यावर अवलंबून असतो. तरीही, आम्ही या मौल्यवान संसाधनांचे प्रचंड नुकसान करत आहोत. महासागर, समुद्र आणि इतर सागरी संसाधने मानवी कल्याणासाठी आणि जगभरातील सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी आवश्यक आहेत. त्यांचे संवर्धन आणि शाश्वत वापर हे विशेषतः लहान विकसनशील देशांसाठी, युनायटेड नेशन्सने ठरवलेल्या 2030 पर्यंतच्या अजेंडाचा महत्वाचा भाग आहे. महासागर मासेमारी, पर्यटन आणि इतर क्षेत्रांतून उपजीविका, निर्वाह आणि असंख्य नैसर्गिक संसाधने आपल्याला उपलब्ध करून देत असतात. ते वातावरणातील उष्णता आणि कार्बन डायऑक्साइड (CO2) शोषून जागतिक परिसंस्थेचे नियमन करण्यास देखील मदत करतात.

- डॉ. स्वप्नजा आ. मोहिते

-------------------------------------

सागरी जीवांचे व्यवस्थापन, संरक्षणासाठी 10 उद्दिष्टे

पृथ्वीवरील सगळ्याच परिसंस्थांचा विचार केला तर त्यांच्या अस्तित्वासाठी तसेच मानवी उपजीविकेसाठी आणि पोषणासाठी समुद्र आणि त्यातील जलचर महत्वपूर्ण आहेत. केवळ सागरी मासळीचाच विचार केला तर हे अंदाजे 1 अब्ज लोकांसाठी प्राथमिक अन्नस्रोत आहेत आणि सागरी मत्स्योद्योग सुमारे 60 दशलक्ष लोकांना रोजगार देते. तथापि, महासागर आणि किनारी भाग यांना पर्यावरणाचा ऱ्हास, अतिमासेमारी, हवामान बदल आणि प्रदूषण यामुळे मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. मासे आणि इतर जलचर प्रजाती या मानवी हस्तक्षेपामुळे असुरक्षित बनल्या आहेत. पक्षी आणि सस्तन प्राण्यांसारख्या स्थलीय प्रजातींपेक्षा जलचर प्रजाती नष्ट होण्याचा दर नेहमीच जास्त असतो हे संशोधनाने सिद्ध झाले आहेच. आज 40 टक्के उभयचर प्राणी, 30 टक्के गोड्या पाण्यातील मासे आणि 30 टक्क्यांहून अधिक प्रवाळ खडक आणि सागरी सस्तन प्राणी धोक्यात आहेत. यासाठीच सगळ्याच देशांना एका व्यासपीठावर येऊन कृती आराखडे ठरवणे क्रमप्राप्त झाले आहे. जगभरातील सर्व सागरी जीवांचे व्यवस्थापन आणि संरक्षणासाठी दहा जागतिक उद्दिष्टे ठरवण्यात आली आहेत.
पहिले उद्दिष्ट आहे सागरी प्रदूषण कमी करण्याबाबतचे. 2025 सालापर्यंत सर्व प्रकारचे जमिनीवरून होणारे सागरी प्रदूषण उदा. समुद्रात टाकला जाणारा कचरा, नदीनाल्यातून वाहून येणारे पेस्टीसाईड्स, खते यांचे रेसिड्यूज, प्रतिबंधित आणि प्रभावीपणे कमी करण्यात यावेत. दुसरे उद्दिष्ट इकोसिस्टमचे संरक्षण आणि पुनर्संचयित करण्यासाठीचे. या द्वारे समुद्री अधिवासाचे बळकटीकरण करून त्यांवर होणारे महत्वपूर्ण प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी कृती करण्याचे आवाहन केले आहे. सागरी आणि किनारी परिसंस्थांचे शाश्वत व्यवस्थापन आणि संरक्षण करून महासागरांचे आरोग्य सुधारून त्यांची उत्पादकता कशी वाढवता येईल यासाठी कृती अपेक्षित आहे. महासागराचे आम्लीकरण कमी करण्यासाठी सर्व स्तरांवर वैज्ञानिक पद्धती वापरून त्यावर उपाय करा, असे तिसरे उद्दिष्ट सांगते. शाश्वत मासेमारी हे चौथे उद्दिष्ट आहे. युनायटेड नेशन्सने 2020 पर्यंत मासेमारीचे प्रभावीपणे नियमन करा आणि प्रमाणाबाहेरील, बेकायदेशीर आणि अनियंत्रित मासेमारी करणे टाळा असे जरी सांगितले असले तरी हे उद्दिष्ट अजूनही साध्य झालेले नाही. यासाठी जागतिक स्तरावरच विनाशकारी मासेमारी पद्धती बंद करून विज्ञान आधारित व्यवस्थापन योजना अंमलात आणणे महत्वाचे आहे. कमीत कमी वेळेत मासेसाठा पुनर्संचयित करण्यासाठी प्रत्येक मासळीच्या जैविक अभ्यासानुसार निर्धारित केलेलं मॅक्सिमम सस्टेनेबल यिल्ड (MSY) म्हणजे किमान पातळीवर जास्तीत जास्त शाश्वत उत्पन्न देऊ शकेल अशा पद्धती विकसित करणे ही आजच्या मासेमारीची गरज आहे. हे डोळ्यासमोर ठेवून हे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे.
उपलब्ध वैज्ञानिक माहिती आणि संशोधनानुसार किमान 10 टक्के किनारपट्टी आणि सागरी क्षेत्रांचे संरक्षण करावे, ओव्हरफिशिंगमध्ये योगदान देणारी सबसिडी देण्याची पद्धत 2020 पर्यंत बंद करण्यात यावी तसेच जास्त क्षमता आणि जास्त मासेमारी करण्यास कारणीभूत ठरणारी काही प्रकारची मत्स्यपालन अनुदाने प्रतिबंधित करण्यात यावीत ही उद्दिष्ट्येही यात समाविष्ट करण्यात आली आहेत. बेकायदेशीर, रिपोर्ट न केलेली आणि अनियंत्रित मासेमारीला हातभार लावणारी सबसिडी काढून टाकावी आणि अशा नवीन सबसिडी सुरू करण्यापासून परावृत्त करण्यात यावे असेही सुचवण्यात आले आहे. विकसनशील आणि कमी विकसित देशांच्या विकासासाठी योग्य आणि प्रभावी पद्धतींचा विचार हा जागतिक व्यापार संघटनेच्या मत्स्योद्योगाच्या अनुदान वाटाघाटीचा अविभाज्य भाग असावा हेही त्यात नमूद करण्यात आले आहे. 2030 पर्यंत मत्स्यपालन आणि पर्यटनाच्या शाश्वत व्यवस्थापनाद्वारे सागरी संसाधनांच्या शाश्वत वापरातून आर्थिक लाभ वाढवणे, महासागराच्या आरोग्यासाठी आंतरसरकारी ओशनोग्राफिक कमिशनचे निकष आणि सागरी तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणावरील मार्गदर्शक तत्त्वे वापरून वैज्ञानिक ज्ञान, संशोधन आणि तंत्रज्ञान वाढवणे, छोट्या स्तरावर मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना मदत पुरवून त्यांना सागरी संसाधने योग्य पद्धतीने वापरण्यास उद्युक्त करणे आणि बाजारपेठांमध्ये मत्स्यविक्रीसाठी सक्षम करणे, महासागर आणि त्यांच्या संसाधनांच्या संरक्षणासाठी आणि शाश्वत वापरासाठी कायदेशीर चौकट प्रदान करणाऱ्या समुद्राच्या कायद्यावरील संयुक्त राष्ट्राच्या कन्व्हेन्शनमध्ये ठरवल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय कायद्याची अंमलबजावणी करून महासागर, त्यांच्या संसाधनांचे संरक्षण आणि शाश्वत वापर वाढवणे अशी उद्दिष्ट्ये जागतिक स्तरावर ठरवण्यात आली आहेत.

(लेखिका मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी येथे मत्स्यजीव शास्त्र विभागात प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.)
-------------------