सिंधुदुर्गात 1154 शिक्षकांच्या बदल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Teacher
सिंधुदुर्गात 1154 शिक्षकांच्या बदल्या

Teachers Transfer सिंधुदुर्गात 1154 शिक्षकांच्या बदल्या

ओरोस - जिल्हा अंतर्गत प्राथमिक शिक्षक बदलीची १८ नोव्हेंबर २०२२ पासून सुरू झालेली प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. यात एकूण सहा टप्पे राबविण्यात आले. एकूण ११५४ शिक्षकांच्या बदल्या झाल्या. ऑनलाईन पद्धतीने विन्सीस कंपनीने राबविलेली ही बदली प्रक्रिया पारदर्शक झाल्याच्या प्रतिक्रिया शिक्षकांमधून येत आहेत.

पूर्वी दरवर्षी वादग्रस्त ठरणारी शिक्षक बदली प्रक्रिया अलीकडच्या काही वर्षांत विनावाद होत आहे. यावर्षी तर खूपच पारदर्शक पद्धतीने ही बदली प्रक्रिया राबविली गेली. कारण शासनाने यासाठी ऑनलाईन पद्धत अवलंबली आहे. बदली पात्र शिक्षकांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया मानवी हस्तक्षेप न होता पूर्ण झाली आहे. याकरिता शासनाने एकूण सहा टप्पे केले होते. विशेष संवर्ग, पतीपत्नी एकत्रीकरण, अवघड क्षेत्रातील बदली, बदली पात्र शिक्षक, विस्थापित शिक्षक, जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे अशा प्रकारे सहा टप्पे राबविण्यात आले.

यातील विशेष संवर्ग हा पहिला टप्पा असून दिव्यांग, परितक्त्या, विधवा अशा एकूण १९ प्रकारच्या विशेष संवर्गातील कार्यरत शिक्षकांना बदलीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. यासाठी जिल्ह्यातील १५३ शिक्षकांनी अर्ज केले. त्यातील १४४ शिक्षक बदलीस पात्र ठरले असून त्यांची बदली झाली आहे. दुसरा टप्पा हा पती-पत्नी एकत्रीकरण यासाठी होता. याकरिता ६८ शिक्षकांनी अर्ज केले होते. त्यातील ६७ शिक्षकांची बदली झाली आहे. तिसरा टप्पा अवघड क्षेत्रातील शिक्षक बदली यासाठी राबविण्यात आला. अवघड क्षेत्रात तीन वर्षे कार्यरत असलेल्या शिक्षकांना यासाठी अर्ज करायचे होते. त्यासाठी एकूण १४५ अर्ज आले होते. त्यातील १३५ शिक्षकांची बदली झाली आहे. १० शिक्षकांची बदली झालेली नाही.

चौथ्या टप्प्यात जिल्ह्यातील बदलीपात्र शिक्षकांनी यासाठी अर्ज करायचा होता. एका शाळेत पाच वर्षे व त्या कार्यक्षेत्रात १० वर्षे कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी हा टप्पा होता. त्यासाठी ७५९ शिक्षक पात्र होते. यातील ७३६ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. पाचवा टप्पा विस्थापित शिक्षकांसाठी राबविला गेला. चौथ्या टप्प्यात बदलीस पात्र असूनही ऑनलाईन अर्ज करून बदली न मागितलेल्या शिक्षकांना थेट विस्थापित करण्यात आले होते. या विस्थापित होणाऱ्या शिक्षकांसाठी हा पाचवा टप्पा राबविण्यात आला. चौथ्या टप्प्यात विस्थापित झालेल्या शिक्षकांना पाचव्या टप्प्यात बदली करून नवीन शाळा देण्यात आली आहे. यात एकूण २९ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. शेवटचा आणि सहावा टप्पा हा जिल्ह्यातील अवघड क्षेत्रात रिक्त असलेल्या शिक्षक पदांवर बदलीने नियुक्ती देणे यासाठी राबविला गेला. या अंतिम टप्प्यात एकूण ४३ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या.

बदली झालेले शिक्षक १ मे पासून कार्यमुक्त

शासनाने शिक्षक बदली प्रक्रिया मार्च महिन्यात पूर्ण केली; मात्र तत्काळ बदली ठिकाणी शिक्षकांना सोडण्याची कार्यवाही होणार नाही. कारण शैक्षणिक वर्ष संपायला एक महिना शिल्लक राहिलेला आहे. तशी कार्यवाही झाल्यास कारभारात अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे शासनाने यासाठी स्वतंत्र आदेश काढले आहेत. १ ते १५ मे या कालावधीत बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येणार आहे. बदली झालेल्या शिक्षकांचा बदली आदेश त्या शिक्षकाच्या व्यक्तिगत पोर्टलवर पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अशी झाली प्रक्रिया

आतापर्यंतच्या शिक्षक बदली प्रक्रियेत सर्वाधिक पारदर्शकता यावेळी राबविली गेली. सुरुवातीच्या काळात ही बदली स्थानिक स्तरावर केली जात होती; मात्र त्यात प्रचंड गोलमाल असायचा. आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोपही होत होता. त्यानंतर राज्याच्या ग्रामविकास विभागाने ही प्रक्रिया ऑनलाईन केली. तरीही त्यात काही प्रकार घडले होते. यावर्षी राज्याने विन्सीस कंपनीला बदली प्रक्रियेचा ठेका दिला. या कंपनीने यासाठी पासवर्ड हा प्रचलित प्रकार ठेवला नव्हता. खाते असलेल्या व्यक्तीचे अकाऊंट दुसरा कोणीही उघडू शकत नव्हता. खातेदाराने आपले अकाऊंट उघडले की त्याच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपी यायचा. तो टाकल्यावर खाते उघडले जायचे. त्यामुळे यात मानवी हस्तक्षेप राहिला नाही.