जनार्दन हरी आठल्ये आणि कृष्णाजी नारायण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जनार्दन हरी आठल्ये आणि कृष्णाजी नारायण
जनार्दन हरी आठल्ये आणि कृष्णाजी नारायण

जनार्दन हरी आठल्ये आणि कृष्णाजी नारायण

sakal_logo
By

(१८ मार्च टुडे तीन)

इये साहित्याचिये नगरी ..........लोगो

फोटो ओळी
-rat२४p५.jpg ः
९१०४७
केरळकोकीळ
-rat२४p६.jpg ः
९१०७७
प्रकाश देशपांडे
-
जनार्दन हरी आठल्ये आणि कृष्णाजी नारायण

आपण इतिहासाबद्दल फारच उदासीन असतो. ‘कशाला जुनी मढी उकरायची?’ असे म्हणून इतिहास म्हणजे जणुकाही मृताचे थडगे मानतो; मात्र या उदासीनतेमुळे बरेच काही हरवून बसतो. मराठी वृत्तपत्र सृष्टीतील असेच दोन दिग्गज विस्मरणात गेले आहेत. मराठी वृत्तपत्राचा प्रारंभ केला आचार्य बाळशास्त्री जांभेकरानी. देवगडजवळच्या पोंभुर्ले गावाने हे नवरत्न मराठी वृत्तपत्रसृष्टीला दिले. ६ जानेवारी १८३२ ला शास्त्रीबुवांनी ‘दर्पण ’पाक्षिक सुरू केले व पुढे त्याचे साप्ताहिकात रूपांतर केले. बाळशास्त्रींचे अवघ्या ३२ व्या वर्षी १८४६ ला निधन झाले. १८३२ ला ‘दर्पण’ निघाले आणि २२ वर्षानंतर रत्नागिरीमधून जनार्दन हरी आठल्ये यांनी १८५४ च्या जून महिन्यात ‘जगन्मित्र’ साप्ताहिक सुरू केले.
-

जनार्दन हरी यांची जन्मतारीख उपलब्ध नाही; मात्र त्यांचा जन्म १८२६ ला झाल्याची नोंद मिळते. रत्नागिरीच्या सरकारी हायस्कुलात शिकून ते मॅट्रिक झाले त्यानंतर त्याच हायस्कुलात शिक्षक म्हणून नोकरीला लागले. मराठी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेचे जाणकार असलेल्या जनुभांऊचा धर्मशास्त्र आणि ज्योतिषाचा विशेष अभ्यास होता. यापुढे हस्तलिखितापेक्षा मुद्रित ग्रंथाना महत्व येणार आहे हे जाणून या ज्ञात्याने १८४८ ला रत्नागिरीत ‘जगमित्र’ छापखाना सुरू केला. या काळात ’दर्पण‘ बंद झाले असले तरी भाऊ महाजनांचे ‘प्रभाकर’ निघत होते. प्रभाकरमधून लोकहितवादी आपल्या ‘शतपत्रा’तून पारंपरिकतेवर आणि अज्ञानावर आसूड ओढत होते. मुंबर्इ आणि पुणे ही दोन शहरे सांस्कृतिक घुसळण करत होती. विशेष म्हणजे जांभेकर असतील, भाऊ महाजन वा लोकहितवादी ही मंडळी मूळ कोकणातील होती. त्यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रबोधनाला प्रारंभ केला होता. पुणे-मुंबर्इ सोडून अन्यत्र कुठे वृत्तपत्राला प्रारंभ झाला नव्हता. या दोन शहरानंतर संपूर्ण महाराष्ट्रात पहिले साप्ताहिक सुरू करण्याचा मान जनुभाऊंच्या ‘जगन्मित्र’ लाच आहे.
जनार्दन हरी यांचा स्वतःचा उत्तम असा ग्रंथसंग्रह होता. स्वतःचा मुद्रण व्यवसाय असल्यामुळेच त्यांनी साप्ताहिकाचा बुडिताचा धंदा सुरू केला. कारण, साप्ताहिक विकत घेऊन वाचायची मानसिकता समाजात आलेली नव्हती. ’जगन्मित्र ‘साप्ताहिकाची वार्षिक वर्गणी ५ रुपये होती आणि वर्गणीदारांची संख्या होती अवघी १७. साप्ताहिकाला येणारे नुकसान ग्रंथछपार्इतून निघत असे. विशेष म्हणजे या १७ वर्गणीदारात मराठीच्या क्रमिक पुस्तकांचे लेखक आणि कोशकार थॉमस कॅडी तसेच कराची येधील फ्रियर हे पुढे मुंबर्इ प्रांताचे गर्व्हनर झाले होते. अशा अभ्यासू व्यक्ती होत्या. ’जगन्मित्र‘चा त्या वेळी ’रत्नागिरीचे गॅझेट‘ असा उल्लेख व्हायचा. धर्म इतिहास संशोधक म्हणून ख्यातनाम असलेल्या विश्‍वनाथ नारायण मंडलिक यांच्याशी आठल्यांचा विशेष स्नेह होता. जगन्मित्र छापखान्यात आठल्ये यांनी ‘धर्मसिंधू’, भावार्थ दीपिका’, ‘बृहत्संहिता’ इ. ग्रंथ प्रकाशित केले. भारतात आलेल्या ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी ख्रिश्‍चन धर्माचा प्रचारक करताना हिंदू धर्मावर टीका करायला प्रारंभ केला. यातून अनेक हिंदू धर्म अभिमानी त्या टीकेला अभ्यासपूर्ण भाषेत लेख लिहून उत्तरे देत. जनुभाऊ आठल्ये यांनी ‘जगन्मित्र’ मधून असे लेख लिहिले होते.
दुर्दैवाने, आज जगन्मित्र साप्ताहिकाचा एकही अंक उपलब्ध नाही. ''मराठी वृत्तपत्रांचा इतिहास’ या लेले यांच्या ग्रंथात (कै.) व. ना. मंडलिक यांच्या चरित्रात आणि नगरहून ख्रिश्‍चन धर्माचा प्रसार करण्यासाठी त्या वेळी प्रसिद्ध होत असलेल्या ज्ञानोदय साप्ताहिकात ‘जगन्मित्र’ चे उल्लेख आढळतात. (कै.) जनार्दन हरी आठल्ये यांची थोडी फार माहिती मराठी वाङ्मय कोशात मिळते. इतिहासाचे साक्षेपी अभ्यासक प्रा. पंकज घाटे यांना रत्नागिरी जिल्ह्याचे तत्कालीन कलेक्टर यांच्या रोजनिशीत ‘जगन्मित्र’ मध्ये आलेल्या बातम्यांचे संदर्भ मिळाले. ‘जगन्मित्र’ छापखाना रत्नागिरी शहरात कुठे होता? स्वतः जनार्दन हरी कुठे राहात होते? छापखाना आणि वृत्तपत्र कधी बंद झाले? याचा शोध घ्यायला हवा. ‘जगन्मित्र’ हा खरेतर अभिमानाचा विषय व्हायला हवा. पुण्या-मुंबर्इनंतर पहिले साप्ताहिक निघण्याचे भाग्य रत्नागिरीला आणि पर्यायाने अपरान्तभूमीला मिळाले. जनार्दन हरींचे छायाचित्रही उपल्ब्ध नाही.

केरळकोकिळकार कृष्णाजीपंत आठल्ये

आठल्ये घराण्याचे मूळ गाव लांजा तालुक्यातील देवळ. पुढे शिपोशी हे गाव इनाम मिळाल्यामुळे बरेच आठल्ये शिपोशीला गेले. याच आठल्ये घराण्यात जन्मलेल्या कृष्णाजी नारायण आठल्ये यांनी ‘केरळकोकीळ’ हे मासिक सुरू केले. कृष्णाजीपंतांचा जन्म ३ जानेवारी १८५३ ला कराडजवळ असलेल्या टेंभू या गावी झाला. प्राथमिक शिक्षण कराडला झाले. विशेष म्हणजे त्याचे सहाध्यायी होते गोपाळराव आगरकर. कराडलाच ते प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला लागले; मात्र कलेची आवड असल्याने मुंबर्इला गेले आणि चित्रकलेचे शिक्षण घेतले. बडोदा संस्थानचे दिवाण सर टी. माधवराव हे मद्रास प्रांतातील कुंभकोणमला जन्मलेले आणि मूळचे महाराष्ट्रातील होते. त्यांनी कृष्णाजीपंतांना बडोदा येथे नोकरीसाठी बोलावून घेतले. बडोद्यात असताना कृष्णाजीपंतांनी ‘पुष्पगुच्छ’ मासिकाचे संपादन केले. पुढे सर माधवराव मद्रासला गेले आणि त्यांच्यासमवेत आठल्येही गेले. आठल्यांचे बंधू केरळमधील कोचिन (आताचे कोची) येथे होते. कृष्णाजीपंत कोचीला गेले. तिथे मराठी, इंग्रजी भाषेचे शिक्षक म्हणून काम केले. कोचीला ते २० वर्षे होते. १८८७ ला मराठी भाषेवर नितांत प्रेम असल्याने त्यांनी कोची येथेच ‘केरळकोकीळ’ मासिक सुरू केले. जिथे मराठी बोलली जात नाही आणि मराठी भाषा बोलणारेही नाहीत, अशा दूरस्थ प्रांतात मराठी मासिक काढणारे कृष्णाजी नारायण आठल्ये धन्य होत. सलग पाच वर्षे कोचीमधून प्रकाशित केल्यानंतर पुढे मुंबर्इमधून प्रकाशित होऊ लागले.
कृष्णाजीपंत हे संस्कृतचे व्यासंगी होते. त्यांनी श्रीमद्भगवद्गीतेचे पद्य रूपांतर ‘गीतापद्य मुक्ताहार‘ केले. त्यांच्या या कार्याचा सन्मान शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांनी केला आणि त्यांना‘ महाराष्ट्रभाषा चित्रमयूर’ म्हणून गौरवले. केरळकोकीळ हे मासिक वाचकांच्या परतीला उतरले होते. साडेतीन हजार वर्गणीदार असलेल्या या मासिकात कृष्णाजीपंतांनी ’मलबार प्रांताचा इतिहास’, ‘महाभारतातील चरित्रे’ लिहिली. पुढे ‘कोकिळाचे बोल'' किंवा ’महाराष्ट्रभाषा चित्रमयूर’ कृ. ना. आठल्ये यांचे ''निवडक लेख'' या नावाने पुस्तक प्रकाशित झाले. विविध विषयांवर त्यांनी ३७ पुस्तके लिहिली. पुढे प्रसिद्धीला आलेले नामवंत कादंबरीकार नाथमाधव केरळ कोकिळमधून विविध या सदरात लिहित असत. लिहिणाऱ्या हातांचा गौरव व कौतुक करण्यासाठी कृष्णाजीपंत ‘कलम बहाद्दरास शेला पागोटे’ या नावाने पुस्तक परीक्षण करायचे. २९ नोव्हेंबर १९२६ ला कृष्णाजीपंत निवर्तले.
जनार्दन हरी आणि कृष्णाजी नारायण या आठल्येद्वयींवर अधिक संशोधन व्हायला हवंय. पूर्वी आपल्याकडे फोटो काढायची पद्धत नसल्याने अनेक नामवंत ‘दिसत होते कसे आननी‘ हे समजत नाही. १८७१ ला (कै.) हरी नारायण लिमये यांनी सुरू केलेले ’सत्यशोधक’ साप्ताहिक आज १५० वर्षानंतरही प्रकाशित होत आहे; मात्र संस्थापक हरी नारायण लिमये यांचे छायाचित्र मिळत नाही. कोकणातील जुन्या घरांमधून असलेल्या दप्तरांचा शोध घेतला तर नक्कीच कुठेतरी एखादा ‘जगन्मित्र’ अंक भेटेल आणि महत्वाचे म्हणजे मुंबर्इचे भाग्यविधाते नाना शंकरशेट यांच्या देणगीतून ना जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती १८६६ ला सुरू झाली. ही शिष्यवृत्ती मिळवणारे पहिले होते तेही एक आठल्ये. त्यांचे नाव यशवंत वासुदेव आठल्ये.

(लेखक इतिहासाचे गाढे अभ्यासक आणि साहित्यिक आहेत.)

-