
दीपक केसरकर केवळ घोषणामंत्री
91106
सावंतवाडी : पत्रकार परिषदेत बोलताना मायकल डिसोजा. शेजारी चंद्रकांत कासार, शिवदत्त घोगळे आदी.
दीपक केसरकर केवळ घोषणामंत्री
मायकल डिसोझा; मार्चनंतर ‘एप्रिलफुल’ आंदोलन छेडणार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ ः आमदार दीपक केसरकर हे मंत्री नसून ते केवळ घोषणामंत्री आहेत. तेरा वर्षांच्या काळात त्यांनी काहीच भरीव असे काम केलेले नाही. आजपर्यंत त्यांनी आश्वासने दिलेली व भूमिपूजने झालेली कामे ३१ मार्चपूर्वी पूर्ण न केल्यास उद्धव ठाकरे शिवसेनेकडून प्रत्येक कामाच्या ठिकाणी ‘एप्रिलफुल’ आंदोलन छेडून केसरकरांचा पोलखोल करू, असा इशारा ठाकरे शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा यांनी दिला.
कोल्हापूर जिल्ह्यापाठोपाठ आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मित्रपक्ष असलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी ‘केसरकर हटाओ’, अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे भाजपातूनच केसरकर यांना जोरदार विरोध आहे, हे स्पष्ट होते. त्यामुळे लवकरच उद्धव ठाकरे शिवसेनेकडूनही केसरकर हटाओ मोहीम राबवली जाईल, असेही डिसोजा म्हणाले. ते आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे शिवसेनेचे चंद्रकांत कासार, राजू शेटकर, शिवदत्त घोगळे, आबा सावंत, संदीप गवस, निशिकांत परब आदी उपस्थित होते.
डिसोजा म्हणाले, ‘‘मंत्री केसरकर यांनी तेरा वर्षांमध्ये आश्वासनापलीकडे येथील जनतेला काहीच दिले नाही. ते केवळ घोषणामंत्री म्हणूनच ओळखले जाऊ लागले आहेत. त्यांनी आजपर्यंत भूमिपूजने आणि घोषणा केलेले मल्टिस्पेशालिटी, कबुलायतदार प्रश्न, कारखाना, सेटअप बॉक्स, ॲक्युझमेंट पार्क, फुलपाखरू उद्यान अशी कामे आज घोषणांमध्येच हरवली आहेत. येथील मल्टिस्पेशालिटीसाठीची जागा चोरीला गेली आहे की हॉस्पिटलच चोरीला गेले आहे, हेच समजत नाही. त्यांच्या आमदारकीला आज तेरा वर्षे पूर्ण झाली असून त्यामुळे केसरकर यांनी मतदारसंघाचा तेरावा घातला का, असा प्रश्नही जनतेतून विचारला जाऊ लागला आहे.’’
---
अर्धवट कामांवर ठेवणार बोट
डिसोझा पुढे म्हणाले, ‘‘केसरकरांची काम करण्याची पद्धतच वेगळी आहे. महाराष्ट्रात अधिकारी, कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करतात, मात्र केसरकरांची कामे अधिकारी करत नाहीत, अशी नेहमीच ओरड असते. केसरकर जे बोलतात, ते आयुष्यात कधीच करत नाहीत, अशी त्यांची ओळख बनली आहे. एकूणच या सर्व प्रकाराचा पोलखोल करण्यासाठी ठाकरे गटाचे शिवसैनिक मतदारसंघात ज्या ठिकाणी अर्धवट स्थितीतील कामे आहेत किंवा ज्या कामांची घोषणा केली आहे, तेथे जाऊन बॅनरबाजी करत ‘एप्रिलफुल’ साजरा करणार आहेत.
--
भाजपमध्ये केरसकरांना स्थानच नाही
‘‘आज त्यांच्याच मित्र पक्षातील भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली येथे येऊन केसरकरांवर जोरदार टीका करतात, शिवाय मतदारसंघात बदल हवा असल्यास आमदार बदला, असेही ते जाहीरपणे बोलतात. त्यामुळे त्यांची ही भूमिका पाहता केसरकरांना भाजपमध्ये स्थान नाही, हे स्पष्ट होते. तेलींपाठोपाठ उध्दव ठाकरे शिवसेनाही लवकरच केसरकर हटाव मोहीम हाती घेणार आहे,’’ असे डिसोझा म्हणाले.