
दोन दुचाकींच्या धडकेत डेगवेमध्ये दोघे गंभीर
पान एक
दुचाकींच्या धडकेत
डेगवेमध्ये दोघे गंभीर
सोसायटीजवळ अपघात ः जखमीस बांबोळीला हलवले
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २४ ः बांदा-दोडामार्ग रस्त्यावर डेगवे सोसायटीनजीक दोन दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात डेगवेतील दोघेजण गंभीर जखमी झाले. राजेश शांताराम सुतार (वय ४२) व संजय सीताराम देसाई (वय ६२) अशी त्यांची नावे आहेत. राजेश सुतार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले. संजय देसाई यांच्यावर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. हा अपघात आज सकाळी झाला.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश सुतार हे सोसायटीच्या दिशेने परतत असताना समोरून सुसाट येणाऱ्या अज्ञात दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर त्या दुचाकीस्वाराने तेथून पलायन केले. यात राजेश हे खाली कोसळले. ही धडक इतकी जोरदार होती की, राजेश यांच्या दुचाकीचे चाक तुटून पडले. डेगवे सोसायटीचे चेअरमन प्रवीण देसाई, भाजपचे तालुका उपाध्यक्ष मधुकर देसाई, सरपंच राजन देसाई यांनी स्थानिकांच्या सहकार्याने अपघातग्रस्तांना मदतकार्य केले. राजेश हे स्थापेश्वर दशावतार मंडळात पखवाजवादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना तत्काळ बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील व डॉ. मयुरेश पटवर्धन यांनी प्राथमिक उपचार केले. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमी युवकांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने दाखल झाला होता. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले. उशिरापर्यंत बांदा पोलिसांत याबाबतची फिर्याद दाखल नव्हती.