
चिपळुणात 29, 30 ला कृषी प्रदर्शन
चिपळुणात बुधवारपासून कृषी प्रदर्शन
चिपळूण, ता. २५ ः राष्ट्रीय कृषी विकास योजना भात लागवड व गुणवत्ता सुधार प्रकल्पाअंतर्गत चिपळूण येथे २९ व ३० मार्चला जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील अण्णासाहेब खेडेकर क्रीडासंकुलात सकाळी ९ ते रात्री ९ दरम्यान हे प्रदर्शन भरणार आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रत्नागिरी व उपविभागीय कृषी अधिकारी चिपळूण यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
या प्रदर्शनात विविध कृषी उप्तादने, यंत्रसामुग्री, खते बी-बियाणे, महिला बचतगटांची उत्पादने असे विविध ५५ स्टॉल्स लावण्यात येणार आहे. याबरोबरच भातपिकांचे विविध वाण, भातपिकासाठी यांत्रिकीकरण तसेच लागवड कापणी, मळणी, काढणीपश्चात तंत्रज्ञान यांचे विविध कंपन्यांचे अवजारे उपलब्ध असतील. भातपिकासाठी पाककला प्रशिक्षण वर्ग, तृणधान्य पिकांच्या पाककला स्पर्धा होतील. यामध्ये नाचणी, वरी, ज्वारी, हरिक, बाजरी या धान्यांपासून तयार करण्यात येणारे विविध प्रकार पाककला स्पर्धेत ठेवण्यात येतील. प्रथम ३ विजेत्या महिलांना साडी, सन्मानचिन्ह व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तसेच सहभागी सर्वांना प्रमाणपत्र मिळणार आहे.
स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी दीपक घोसाळकर, संतोष आंबवकर, पंकज कोरडे अथवा उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. इच्छुकांना मंगळवारपर्यंत (ता. २८) ऑनलाईन प्रवेश घेता येणार आहे. या वेळी तृणधान्यापासून विविध पदार्थ बनवण्याचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कोल्हापूर येथील राजश्री सावंत या बुधवारी (ता. २९) मार्गदर्शन करण्यास उपस्थित राहणार आहेत. या वेळी भातपिक उत्पादन घेणारे शेतकरी, महिला, महिला बचतगट व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाने केले आहे.