शालेय पोषण आहार योजना

शालेय पोषण आहार योजना

२० मार्च टुडे तीन

शिक्षण : लोकल टू ग्लोबल--लोगो

फोटो ओळी
-rat२६p१०.jpg ः
91464
डॉ. गजानन पाटील
-
विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची प्रेरणा म्हणजे शालेय पोषण आहार योजना

खरंतर मुलांनी दररोज शाळेत आनंदाने यावं, आनंदाने शिकावं, घडावं ही अपेक्षा ठेवून सर्व शिक्षणव्यवस्था काम करत आहे. आम्ही शाळाभेटीला गेल्यावर हमखास एक प्रश्न सर्व मुलांना विचारायचो की, तुम्हाला शाळेत यायला का आवडते? तशी मुलं म्हणायची, शाळा चांगली आहे, इथे शिकायला मिळते, मज्जा करायला मिळते, मित्र भेटतात, शिक्षक चांगले आहेत; पण काही मुलं न लाजता बोलतात आम्हाला इथे दुपारचं चांगलं जेवायला मिळते म्हणून आम्हाला शाळा आवडते. ही जी काही मुलं असतात ती मुलं गोरगरीब, कष्टकरी, कामकरी, मजूर, शेतकऱ्यांची असतात. त्यांची प्रेरणा ही दुपारचं जेवण असते. शाळेत चांगलं शिक्षण मिळतं. उज्ज्वल भविष्यकाळ, चांगले गुरूजी आणि जीव लावणाऱ्या मित्रमंडळी यांच्यासोबतच किमान एकवेळ पोटभर भरपेट खायला मिळतं ही खरंतर मूळ मुलांची आत्मप्रेरणा असते. स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरसुद्धा चांगलं पोटभर खायला मिळतं म्हणून शाळेत येणाऱ्यांची संख्या आजही लक्षणीय अशी आहे. विद्यार्थ्यांच्या पोषणाची काळजी घेणाऱ्या या योजनेचं नाव आहे शालेय पोषण आहार योजना.
- डॉ. गजानन पाटील
--

आपल्या देशात सर्वात प्रथम १९३० ला पाँडिचेरीत तत्कालीन फ्रेंच प्रशासनाच्या साहाय्याने ही मध्यान्ह भोजन योजना शाळकरी मुलांसाठी लागू केली गेली होती. मग टप्प्याटप्प्याने तामिळनाडूत आणि १५ ऑगस्ट १९९५ पासून देशभरात ही मध्यान्ह भोजन योजना लागू झाली. सर्व शिक्षा अभियानांतर्गत सर्व सरकारी, निमशासकीय, स्थानिक प्रशासनांच्या शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू आहे. पहिली ते पाचवीपर्यंत प्रति विद्यार्थी ४५० कॅलरीज आणि १२ ग्रॅम प्रोटिन तर सहावी ते आठवीपर्यंत प्रति विद्यार्थी ७०० कॅलरीज आणि २० ग्रॅम प्रोटिन मिळावे, अशी या आहाराची रचना केलेली आहे. या योजनेमागची सर्वात महत्वाची उद्दिष्टे म्हणजे शाळेत मुलांची उपस्थिती वाढावी, विद्यार्थी मध्येच शाळा सोडून जाण्याचे प्रमाण घटावे, कुपोषण थांबावे आणि योग्य पोषण झालेल्या विद्यार्थ्यांचा शाळेतून चांगला बौद्धिक विकास व्हावा ही उद्दिष्टे साध्य झाली का? याबाबत आपण १०० टक्के होय, असे ठाम उत्तर देऊ शकत नसलो तरी या योजनेचा गरजू, गरीब स्तरातील मुलांना उत्तम फायदा झाला आहे, हे नाकारता येणार नाही.
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या आकडेवारीची तुलना याबाबत बोलकी आहे. NFHS सर्व्हे ५ नुसार (२०१९-२१) देशभरात वयानुसार कमी उंची असलेली मुलं ३५.५ टक्के आहेत ती आधी ३८.४ टक्के होती. कमी वजनाची मुलं ३२.१ टक्के होती ती आधी ३५.८ टक्के होती म्हणजे आकडेवारीत सुधारणा होताना दिसतेय. हे जरी खरं असलं तरीसुद्धा याच सर्वेक्षणात चिंता दाटून यावी, अशा बाबीही आहेतच. उदा. उंची आणि वजनाचा मेळ न बसणाऱ्या मुलांच्या देशस्तरीय यादीत महाराष्ट्रातील दोन जिल्हे खालून तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत ते आहेत धुळे (३८.९ टक्के) आणि चंद्रपूर (३८.५ टक्के) तर कुपोषित अर्थात कमी वजनाची मुलं असण्यात देशात खालून दुसऱ्या क्रमांकावर नंदुरबार आहे (५७.२ टक्के). महाराष्ट्रात ६ महिने ते ५ वर्षांपर्यंतच्या अशक्त मुलांची आकडेवारी आहे ६८.९ टक्के. मुळात महाराष्ट्रातील १५ ते ४९ वयापर्यंतच्या गर्भवती महिलाच पुरेसे पोषण नसलेल्या (ॲनिमिक) असल्याचे प्रमाण ४५.७ टक्के आहे. ही सगळी आकडेवारी पाहता काळजी करणारी परिस्थिती आहे म्हणूनच सही पोषण तो देश रोशन! ही पोषण अभियानाची घोषणा रास्तच आहे आणि त्याच्याच अनुषंगाने केंद्र शासनाने आता या योजनेचे नाव बदलून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना असे केले आहे. १ लाख ३० हजार ७९४ कोटींच्या तरतुदीतून देशभरातील साधारणपणे ११.८० कोटी विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल, असा अंदाज आहे. या योजनेचा ६० टक्के खर्च केंद्र शासनाने तर राज्य सरकारांनी ४० टक्के खर्च उचलणे अभिप्रेत आहे.
योजनेच्या नाम बदलाबरोबरच काही नवीन तरतुदीही आल्या आहेत. उदा. या योजनेत मुलांना फक्त पोषण आहार देण्यापेक्षा त्यांचे खरोखर पोषण होतेय का? त्याचा त्यांना फायदा होतोय का? हे पाहण्यासाठी शाळास्तरावर एका पोषणतज्ज्ञाची नेमणूक करण्याची योजना आहे. पोषणतज्ज्ञाने विद्यार्थ्यांचा बीएमआय, वजन, हिमोग्लोबिन इत्यादीची वेळोवेळी नोंद ठेवणे अपेक्षित आहे. ज्या जिल्ह्यात रक्तक्षय (ॲनिमिया) मोठ्या प्रमाणात आहे तिथे विशेष शक्तीवर्धक पोषण आहार दिला जाणार. परसबागेतून अर्थात पोषण उद्यानातून पोषक भाज्या शाळांनी पिकवाव्यात यावरही भर, पोषण आहाराच्या पाककृती स्पर्धांचे स्थानिक पातळीवर आयोजन अशा तरतुदी आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची प्रेरणा म्हणजे शालेय पोषण आहार योजना आहे, हे लक्षात घ्यायला हवे.

(लेखक प्रयोगशील शिक्षणतज्ज्ञ , मानसतज्ज्ञ व समुपदेशक असून स्तंभलेखक आहेत.)
-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com