पालिकेच्‍या कामामुळे कोंडी

पालिकेच्‍या कामामुळे कोंडी

पालिकेच्‍या कामामुळे कोंडी
कांदिवली ः कांदिवली पश्चिम न्यू लिंक रोडवर श्यामजी बापू सिग्नल चौकात पालिकेच्या वतीने भूमिगत जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. सिग्नल चौकात गेले महिनाभर हे काम सुरू असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. दुतर्फा एकेरी मार्गामुळे वाहनचालकांना सिग्नल मिळाल्यानंतरही वाहतुकीच्या कोंडीचा सामना करत मार्गक्रमण करावे लागत असल्याने वाहनचालकांसह प्रवासी हैराण झाले आहेत. कांदिवली पश्चिम एकता नगर श्यामजी बापू चौकात पालिकेच्या वतीने तीन आठवड्यांपूर्वी नव्याने ४८ इंचाची भूमिगत जलवाहिनी टाकण्यात आली आहे. यामुळे जवळपास ६० टक्के मार्ग वाहतुकीस बंद झाला आहे. न्यू लिंक रोडवर प्रचंड प्रमाणात वाहतूक असते. सध्या पूर्ण झालेल्या कामाच्या बाजूने लोखंडी बॅरिकेटस् लावण्यात आलेले आहे. यामुळे १५ दिवस वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. सिग्नल चौक असल्याने सिग्नल मिळताच निघणाऱ्या वाहनांना कोंडीत अडकावे लागत आहे. यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. कोणते वाहन कुठून येते हेच कळत नसल्याने, कोंडी होऊन एक सिग्नल वाट पाहवी लागत आहे. अशा ठिकाणी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी किमान सायंकाळी पोलिस तैनात करावेत, अशी मागणी स्थानिक नागरिक, प्रवासी आणि वाहनचालकांकडून जोर धरू लागली आहे.
---
रेल्वे स्थानकात सरकत्या जीन्यांची मागणी
प्रभादेवी : प्रभादेवी रेल्वे स्थानकात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी स्थानकात सरकते जिने व लिफ्ट बसविण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने केली आहे. पश्चिम रेल्वेवरील परळ व प्रभादेवी लोकल यांना जोडणारे हे रेल्‍वे स्थानक असल्यामुळे या स्थानकात प्रचंड गर्दी होते. ही गर्दी वाढत राहणार असून त्‍यासाठी येथे सरकते जिने व लिफ्ट बसविण्यात यावी, अशा मागणीचे पत्र राष्ट्रवादी कॉँग्रेसचे दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष रमेश परब यांनी पश्चिम रेल्वेच्या प्रबंधकांना दिले. या वेळी शरद शिरीषकर, राजेश बनसोडे, सुनील वराडकर आदी उपस्थित होते. प्रभादेवी रेल्‍वे स्थानकात सरकते जिने व लिफ्ट नसल्यामुळे प्रवाशांना अनेक समस्‍यांचा सामना करावा लागतो. विशेष करून गर्भवती महिला, ज्‍येष्‍ठ नागरिक, अपंग यांना गाडी पकडण्यासाठी फलाटावर येणे कठीण होत आहे. त्‍यांच्‍यासाठी सरकते जिने, लिफ्ट आवश्‍यक असून तातडीने प्रभादेवी स्‍थानकात या सुविधा द्याव्‍यात, अशी मागणी परब यांनी केली आहे.
---
भुयारी पादचारी मार्गावर दुर्गंधी
जोगेश्वरी ः अंधेरी पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या एकमेव पादचारी भुयार मार्गात सध्‍या दुर्गंधीचे सामाज्‍य पसरले आहे. येथील कचऱ्याचे डबे भरले असून येथील कचरा वेळेत उचलला न गेल्‍याने येथून ये-जा करणाऱ्या पादचारी नागरिकांना याचा त्रास सहन कराव लागत आहे. अंधेरी पूर्व-पश्चिम जोडणारा हा एकमेव पादचारी भूयारी मार्ग असल्‍याने येथून सकाळ-संध्‍याकाळ नेहमी वर्दळ असते. दिवसभरात लाखो नागरिक येथून मार्गक्रमण करत असतात; मात्र येथील घाणीमुळे नागरिक त्रस्‍त झाले आहेत. या परिसरातील व्‍यापारी येथे कचरा टाकत असल्‍याचा आरोप नागरिक करत असून त्‍यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच या मार्गातील कचरा साफ होत नसल्‍याने नागरिकांच्‍या आरोग्‍याचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. पालिकेने त्‍वरित कार्यवाही करून दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com