रत्नागिरी ः शास्त्रज्ञ, अंतराळवीर होऊन इस्रोमध्ये देशसेवा करा

रत्नागिरी ः शास्त्रज्ञ, अंतराळवीर होऊन इस्रोमध्ये देशसेवा करा

फोटो ओळी
- rat१०p१३.jpg- KOP२३L९४८११ मुंबई ः नासासाठी निवड झालेल्या रत्नागिरीतील विद्यार्थ्यांनी राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली.
- rat१०p१४.jpg-KOP२३L९४८१२ मुंबई ः रत्नागिरीचे हापूस आंबे राज्यपालांना भेट देताना विद्यार्थी.


शास्त्रज्ञ, अंतराळवीर होऊन इस्रोमध्ये देशसेवा करा
राज्यपाल बैस ः नासाला जाणाऱ्या रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांना दिल्या शुभेच्छा
गावतळे/रत्नागिरी, ता. १० ः रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील नासाच्या भेटीला जाणार्‍या ९ विद्यार्थ्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी शुभेच्छा देतानाच भविष्यात शास्त्रज्ञ, अंतराळवीर होऊन इस्रोमध्ये देशसेवा करा, असे त्यांनी सूचित केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने नासा-इस्रो या अंतराळ संशोधनातील महत्वाच्या संस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दाखवण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. अमेरिकेतील नासा या संशोधन संस्थेला भेट देण्यासाठी जिल्ह्यातील ९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. अमेरिकेला जाण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी नऊ विद्यार्थी, शिक्षण विभागाचे अधिकारी आणि शिक्षक सध्या मुंबईत आहेत. नासासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी रविवारी (ता. ९) राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. या प्रसंगी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अभिनव उपक्रमाचे आणि नासासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे राज्यपालांनी कौतुक केले तसेच २५ मे ते ५ जूनच्या (नासा) अमेरिका दौऱ्‍यासाठी शुभेच्छाही दिल्या. या वेळी बैस यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘जिल्हा परिषदेने दिलेल्या इस्रो-नासा भेटीच्या संधीचे विद्यार्थ्यांनी सोने करावे. या संधीचे फलित म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी भविष्यात शास्त्रज्ञ, अंतराळवीर होऊन आपल्या इस्रोमध्ये देशसेवा करावी.’
राज्यपाल बैस यांनी सर्वांना ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे अग्नीपंख पुस्तक भेट दिले. या वेळी विद्यार्थ्यांनी राज्यपालांना हापूस आंबेही भेट दिले. या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, उपशिक्षणाधिकारी संदेश कडव, वैद्यकीय अधिकारी शिर्के यांच्यासह अभय भुवड, आशिष गोबरे, भूषण भुवड, वेदांत मोरे, वेदांत सनये, प्रभुती घागरूम, धनश्री जाधव, आरोही सावंत, सोनाली डिंगणकर हे विद्यार्थी उपस्थित होते. नासा-इस्रो भेट दौर्‍यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंह, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कीर्तीकिरण पुजार यांनी विशेष पुढाकार घेतला होता.

चौकट
मुलांचा राज्यपालांबरोबर संवाद
मुलांबरोबर संवाद साधताना राज्यपाल बैस यांनी निवडीविषयी माहिती विचारली. तेव्हा प्रभुती घागरूम आणि वेदांत सनये या दोन विद्यार्थ्यांनी परिचय करून देतानाच दौऱ्‍याविषयी माहिती दिली. नासाला जाण्यापूर्वी भारतामधील इस्रो या अंतराळ संशोधन संस्थेला आम्ही भेट दिली. त्या वेळी आमचा अनुभव चांगला होता. ही निवड करण्यासाठी जिल्हा परिषदेने आमच्या परीक्षा घेतल्या होत्या. त्यामध्ये अव्वल गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची दौऱ्‍यासाठी निवड केली. त्यामध्ये आमचा समावेश असल्याचे घागरूम आणि वेदांतने सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com