दाभोळ ः दापोलीतील व्यावसायिक फैजान रखांगेना अटक

दाभोळ ः दापोलीतील व्यावसायिक फैजान रखांगेना अटक

दापोलीतील व्यावसायिक फैजान रखांगेना अटक

नगरसेवकाचा पुत्र ; नगरपंचायतीतील गैरव्यवहार प्रकरणी कारवाई

दाभोळ, ता. १० ः दापोली येथील व्यावसायिक फैजान रखांगे याला रत्नागिरी जिल्हा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून काल (ता. ९) रात्री ८ वाजताच्या सुमारास अटक करण्यात आली आहे.दापोली नगरपंचायतीचे राष्ट्रवादीचे नगरसेवक अन्वर रखांगे यांचा हा मुलगा आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने नगरसेवक पुत्राला अटक केल्याने दापोली नगरपंचायतीतील सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ उडाली आहे.
दापोली नगरपंचायतीचे तत्कालीन लेखापाल दीपक सावंत यांनी नगरपंचायतीमध्ये कोट्यवधींचा आर्थिक अपहार केल्याची तक्रार दापोली नगरपंचायतीचे लेखापाल सिद्धेश खामकर यांनी दापोली पोलिस ठाण्यात दाखल केल्यावर दीपक सावंत सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांनी सावंत खेड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयात हजर झाले त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. सध्या ते जामिनावर मुक्त आहेत.
या प्रकरणाचा तपास जिल्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला आहे. फैजान रखांगे यांच्या बँक खात्यात दीपक सावंत यांनी जवळपास दीड कोटींपेक्षा अधिक रक्कम वर्ग केल्याची कागदोपत्री माहिती पोलिसांना मिळाली होती. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी गेले चार दिवस फैजान रखांगे यांना ताब्यात घेण्यासाठी दापोलीत तळ ठोकून होते. फैजान रखांगे गेले काही दिवस देशाबाहेर गेल्याची चर्चा होती; मात्र ते दापोलीत येताच या पथकाकडून त्यांना दापोली येथून अटक करण्यात आली आहे.
दापोली नगरपंचायतीमधील अपहाराचे प्रकरण सत्ताधारी असलेल्या शिवसेना (ठाकरे गट) व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी उघड केले होते; मात्र या प्रकरणात आता राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या मुलालाच अटक झाल्याने दापोलीत खळबळ उडाली आहे.

दृष्टिक्षेपात
* नगरपंचायतीमध्ये कोट्यवधींचा घोटाळा
* दीपक सावंतनी दीड कोटी रक्कम केली वर्ग
* शिवसेना-राष्ट्रवादीनेच केला होता घोटाळ्याचा पोलखोल
* जिल्हा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी चार दिवस दापोलीत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com