रत्नागिरी-क्राईम

रत्नागिरी-क्राईम

अंमली पदार्थ प्रकरणी संशयिताचा जामीन फेटाळला
रत्नागिरी ः शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात अंमली पदार्थ बाळगणाऱ्या संशयिताचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. साहिल हनिफ मेमन (वय २५, रा. झारणीरोड, बेलबाग, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना ३० मार्चला रात्री पावणेदहाच्या सुमारास रेल्वेस्टेशन परिसरात घडली होती. संशयिताकडून पोलिसांनी ५१० ग्रॅम गांजा तसेच ११ ग्रॅम हेराईन पोलिसांनी जप्त केले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेस्टेशन परिसरात गांजा विक्री होणार असल्याची खबर शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ३० मार्चला पोलिस रत्नागिरी रेल्वे स्टेशन परिसरात दबा धरुन बसले होते. यावेळी एक तरुण संशयास्पद हालचाली करत असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी या तरुणाची चौकशी केली असता त्याच्याकडे गांजा व हेराईन असा अमली पदार्थ आढळून आला. त्याने आपले नाव साहिल हानिफ मेमन असे सांगितले. अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अंमली पदार्थ कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन अटक केली होती. या प्रकरणी साहिलने जामिनासाठी अर्ज सत्र न्यायालयापुढे दाखल केला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात या जामीन अर्जावर सुनावणी झाली. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. प्रफुल्ल साळवी यांनी काम पाहिले. न्यायालयाने संशयित साहिल याचा जामीन अर्ज फेटाळला.

मद्यप्राशनाबद्दल संशयिताविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः शहरातील जलतरण तलावाच्या समोरील रस्त्यावर एका टपरीच्या आडोशाला मद्य प्राशन करणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (ता. ९) रात्री पावणेनऊच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित हा साळवी स्टॉप येथील जलतरण तलाव येथील एका टपरीच्या आडोशाला मद्य प्राशन करताना निदर्शनास आला. या प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत.


वाहतुकीस अडथळा करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील गणपतीपुळे येथील मोरयातिठा ते आपटातिठा येथे भररस्त्यात आरडाओरडा करून पत्नीला शिवीगाळ करून वाहतुकीस अडथळा करणाऱ्या तरुणा विरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (ता. ९) दुपारी अडीचच्या सुमारास मोरयातिठा ते आपटातिठा रस्त्यावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित २६ वर्षाचा तरुण मद्य प्राशन करून सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आपल्या पत्नीला शिवीगाळ देत होता. रस्त्यावर मध्यभागी उभा राहून वाहतुकीस अडथळा करत होता. या प्रकरणी पोलिसांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत.

लोटेतील चोरीप्रकरणी तीन अज्ञातावर गुन्हा
खेड ः तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील पत्र्याच्या शेडमधून साहित्य चोरल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना ५ ते ६ एप्रिलदरम्यान घडली. एमआयडीसी कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेडचे कुलूप तोड़ून साहित्य चोरल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. तिन्ही चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

दस्तुरी अपघातातील बसचालकावर गुन्हा
खेड ः दापोली मार्गावरील दस्तुरी येथील हॉटेल दीप्तीजवळ कारला धडक देऊन अपघात केल्याप्रकरणी एसटी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारचालक खेड येथून फुरूस येथे जात असताना वेगाने येणाऱ्या बसचालकाने धडक देऊन अपघात केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


तरुणाचा मृत्यूप्रकरणी
ट्रेलर चालकावर गुन्हा
खेड ः तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत विजेच्या खांबावर फॅब्रिकेशनचे काम करताना खाली पडून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता‌. ४) एप्रिलला दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान घडली. संजय चव्हाण असे त्याचे नाव असून या तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ट्रेलर चालकावर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोटे औद्योगिक वसाहतीत मंगळवारी दुपारी संजय चव्हाण हा तरुण खांबावर चढून फॅब्रिकेशनचे काम करत होता. त्या वेळी ट्रेलर (एमएच ४६, एआर ४३७१) येत होता; मात्र, संजय चव्हाण याने त्यांच्या हातातील लाल झेंडा दाखवून ट्रेलर चालकाला थांबण्याचा इशारा केला होता. मात्र, तो न थांबता पुढे आल्याने ट्रेलरला दोन विद्युतवाहिनीच्या तारा लागून तुटल्या. त्यामुळे विजेच्या खांबांना हिसका बसून खांबावर काम करणारा संजय चव्हाण खाली पडला. या घटनेत त्याच्या डोक्याला व मानेला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी नातेवाइकांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालकावर ८ एप्रिलला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास खेड पोलिस करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com