उन्हाळ्याची भीती नको, दक्षता घ्या

उन्हाळ्याची भीती नको, दक्षता घ्या

उन्हाळ्याची भीती नको, दक्षता घ्या

डॉ. श्रीपाद पाटील; उष्माघातावर प्रथमोपचारांची मात्रा

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २२ ः जिल्ह्यात सध्या उष्णतेचा पारा चढला आहे. वातावरणामध्ये वाढत चाललेल्या उन्हामुळे शरीरावर अनेक दुष्परिणाम दिसून येतात. काही वेळेस मृत्यूही ओढवला जाऊ शकतो. याबाबत भीती न बाळगता दक्षता घेण्याचे आवाहन प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले.
डॉ. पाटील म्हणाले, ‘‘आपल्या शरीराचे तापमान नेहमी ३७ अंश सेल्सिअस असते. या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात. घामाच्या रुपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७ अंश सेल्सिअस तापमान कायम राखते. सतत घाम निघत असताना पाणी पीत राहणे अत्यंत गरजेचे आहे. पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामे करते. त्यामुळे शरीरातील पाण्याचा साठा कमी झाला तरी ते घामाच्या रुपाने पाणी बाहेर टाकणे टाळते. जेव्हा वातावरणातील तापमान ४५ अंशाच्या पुढे जाते आणि शरीरातील कुलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचे तापमान ३७ अंशांच्या पुढे जाऊ लागते. शरीराचे तापमान जेव्हा ४२ अंशाला पोहोचते, तेव्हा रक्त तापू लागते आणि रक्तातले प्रोटीन अक्षरश: शिजू लागतात. परिणामतः रक्त घट्ट होते. ब्लडप्रेशर कमी होते. मेंदूचा रक्तपुरवठा थांबतो. यामुळे माणूस कोमात जाऊन एक एक अवयव क्षणात बंद पडतात आणि मृत्यू ओढवतो. उष्णतेमुळे कातडी लालसर होणे, सूज येणे, वेदना, ताप आणि डोकेदुखी आदी आजार जडू शकतात. त्यावर प्रथमोपचार म्हणून साधा साबण वापरून आंघोळ करावी. घामास अडथळा करणारा कातडीवरील तेलकटपणा दूर करावा. कातडीवर फोड असतील, तर वैद्यकीय सल्ला घ्यावा. उष्णतेमुळे स्नायूंमध्ये गोळे येणे (हिट क्रॅम्प्स) हा आजार होऊ शकतो. त्याची लक्षणे हातापायांना गोळे, पोटाच्या स्नायूत मुरडा येणे, खूप घाम येणे ही असून अशी लक्षणे आढळणाऱ्या रुग्णाला सावलीत आणि थंड जागेत हलवावे. दुखणाऱ्या स्नायूला हलका मसाज द्यावा, थोडे-थोडे पाणी प्यायला द्यावे. उलटी झाल्या पाणी देऊ नये.’’
डॉ. पाटील पुढे म्हणाले, ‘‘उष्णतेमुळे प्रचंड थकवा (हिटएक्झॉस्टेशन) जाणवू शकतो. खूप घाम येणे, थकवा येऊन कातडी थंडगार पडणे, नाडीचे ठोके मंद होणे, डोकेदुखी, चक्कर, उलटी अशी याची लक्षणे आहेत. यावर प्रथमोपचार म्हणून रुग्णाला थंड जागी, शक्यतो ''एसी''मध्ये झोपवा. अंगावरील कपडे सैल करा. ओल्या थंड फडक्याने अंग पुसून घ्या. थोडे-थोडे पाणी पाजत राहा. उलटी होत असेल तर पाणी न देता दवाखान्यात हलवावे. कडक उन्हाळ्यात उष्माघात (हिट्स् स्ट्रोक) हा आजार होऊ शकतो. ताप (१०६ डिग्री) येणे, कातडी-गरम आणि कोरडी होणे, नाडीचे ठोके वेगात आणि जोरात होणे, घाम येणे बंद होणे, अर्धवट शुध्दी ही याची लक्षणे असून यावर प्रथमोपचार म्हणून रुग्णाला तत्काळ दवाखान्यात भरती करणे आवश्यक आहे. थंड जागी, एसीमध्ये न्यावे. कपडे काढून थंड पाण्याने आंघोळ किंवा स्पोन्जिंग करावे. हे उपचार करणे आवश्यक आहे."
..............
चौकट
उष्णतेपासून बचावासाठी हे करा!
उष्णेतेपासून बचाव करण्यासाठी पुरेसे पाणी प्या. प्रवासात पाणी सोबत ठेवा. हलक्या वजनाचे, फिकट रंगाचे सैलसर कपडे वापरा. उन्हात गॉगल, छत्री व पादत्राणे वापरा. उन्हात जाताना टोपी किंवा हॅटखाली ओलसर कपडा ठेवा. पाळीव प्राण्यांना सावलीत थंड ठिकाणी ठेवा. ओलसर पडदे, पंखा, कुलरच्या मदतीने घर थंड ठेवा. शक्यतो उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळा. कष्टाची कामे उन्हात करू नका. उभ्या वाहनात चिमुकल्यांना ठेवू नका. गडद रंगाचे तंग कपडे वापरू नका. भर उकाड्यात स्वयंपाक करणे टाळा. स्वयंपाक हवेशीर ठेवा. मद्य, चहा, कॉफी, सॉफ्टड्रिंक टाळा. खूप प्रथिनेयुक्त अन्न आणि शिळे अन्न खाऊ नका, असा सल्ला डॉ. पाटील यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com