Railway
RailwaySakal

Railway : वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्ग हे एक स्वप्नच ठरण्याची शक्यता?

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र लोहमार्गाने जोडावे, अशी मागणी गेल्या तीस-चाळीस वर्षांपासून सुरू होती. कोल्हापूर आणि कोकणातील अनेक नेते त्यासाठी आग्रही होते.
Summary

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र लोहमार्गाने जोडावे, अशी मागणी गेल्या तीस-चाळीस वर्षांपासून सुरू होती. कोल्हापूर आणि कोकणातील अनेक नेते त्यासाठी आग्रही होते.

वैभववाडी - मोठा गाजावाजा झालेला नियोजित वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्ग हे एक स्वप्नच ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या रेल्वेमार्गाची घोषणा झाल्यानंतर पुढील सर्वच प्रकिया थंडावल्यामुळे हा मार्ग होणार की नाही, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. या मार्गाचा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला मोठा फायदा होणार होता.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र लोहमार्गाने जोडावे, अशी मागणी गेल्या तीस-चाळीस वर्षांपासून सुरू होती. कोल्हापूर आणि कोकणातील अनेक नेते त्यासाठी आग्रही होते. अनेकदा सर्वेक्षण झाले; परंतु प्रत्यक्षात राजकीय इच्छाशक्ती प्रत्येक वेळी कमी पडली. केंद्रीय रेल्वेमंत्रिपदाची धुरा सुरेश प्रभूंनी स्वीकारल्यानंतर पुन्हा एकदा कोकणातील रेल्वेमार्गाचा मुद्दा पुढे आला. त्यानंतर कोकणातील काही नियोजित मार्गाबाबत चर्चा झाली; मात्र वैभववाडी-कोल्हापूर हाच रेल्वेमार्ग प्राथमिक सर्वेक्षणानंतर योग्य असल्याचे स्पष्ट झाले.

२०१५ मध्ये नियोजित वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचे काम जे. पी. इंजिनियरिंग कंपनीला देण्यात आले. या कंपनीने गुगल मॅपचा आधार घेत अतिशय खडतर असलेल्या या मार्गाचे सर्वेक्षण अवघ्या काही महिन्यांत पूर्ण केले. मंत्री श्री. प्रभू २०१६ मध्ये यांनी वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाची घोषणा करीत १०७ किलोमीटरच्या या रेल्वेमार्गासाठी अर्थसंकल्पात ३ हजार २०० कोटीची घोषणा केली.एवढेच नाही तर अर्थसंकल्पात २५० कोटीची तरतूद देखील केली होती. या तरतुदीमुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.

रेल्वेमंत्री प्रभू असल्यामुळे त्या कामाला गती मिळेल आणि मार्गाला मूर्तस्वरूप येईल, अशी धारणा सर्वसामान्यांची होती; मात्र अवघ्या काही महिन्यांत श्री. प्रभू यांना काही कारणास्तव केंद्रीय रेल्वेमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले आणि त्याचबरोबर वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाच्या प्रकियेलाच खीळ बसली. प्रकल्पाच्या घोषणेनंतर आता तब्बल सात वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. या सात वर्षांत वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्ग पूर्णत्वास जाईल, अशी कोणतीही हालचाल सध्या प्रशासकीय पातळीवर सुरू नाही. त्यामुळे वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्ग एक स्वप्नच ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बोलाची कढी, बोलाचाच भात

वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाचा अनेक राजकीय नेते राजकीय फायद्यासाठी सातत्याने उपयोग करीत असतात. अनेक नेते तर हा मार्ग आपल्यामुळेच मंजूर झाला असल्याचा दावा करून राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतात; परंतु हा रेल्वेमार्ग म्हणजे ''बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात'' ठरल्याची चर्चा लोकांमध्ये सुरू आहे.

दृष्टिक्षेपात....

* वैभववाडी-कोल्हापूर हा नियोजित मार्ग १०७ किलोमीटरचा आहे.

* या रेल्वेमार्गावर १० स्थानके, ५ उड्डाणपूल, २६ बोगदे असणार आहेत.

* वैभववाडी, सोनाळी, कुंभारवाडी, कुसुर-उंबर्डे, मांगवली, उपळे, ऐनारी (ता. वैभववाडी), सैतवडे, कळे, भुये, कसबा बावडा, मार्केट यार्ड कोल्हापूर असा मार्ग निश्चित केला होता.

वैभववाडी-कोल्हापूर मार्ग अस्तित्वात आल्यास कोकणाला मोठा फायदा होणार आहे; परंतु या रेल्वेमार्गाबाबत कोणतीही प्रकिया सध्या सुरू नाही. यासंदर्भात सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चा झाली होती. हा रेल्वेमार्ग व्हावा, अशी मागणी आम्ही शासनाकडे केली आहे; परंतु हा मार्ग पूर्ण करण्याइतका निधी कोकण रेल्वेकडे नाही. त्यामुळे राज्याने केंद्राशी करार करून हा मार्ग पूर्ण करावा, अशी आमची मागणी आहे.

- विजय केनवडेकर, सदस्य, सल्लागार समिती, कोकण रेल्वे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com