वीस एकरवर फुलली नैसर्गिक शेती

वीस एकरवर फुलली नैसर्गिक शेती

99302
ओरोस ः येथे नैसर्गिक शेतीमधून फुलविलेला भुईमूग पिकाचा मळा.
99303
दुसऱ्या छायाचित्रात नैसर्गिक शेती उपक्रमाची पाहणी करताना ब्रिगेडियर सुधीर सावंत, डॉ. प्रमोद सावंत आदी.


वीस एकरवर फुलली नैसर्गिक शेती

ओरोसमध्ये प्रयोग; कृषी महाविद्यालय विद्यार्थ्यांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २९ ः रासायनिक अवशेषमुक्त अन्न निर्मितीसाठी नैसर्गिक शेती हाच उत्तम पर्याय असून छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नैसर्गिक शेतीचा मळा फुलविण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाने नैसर्गिक शेतीचा यशस्वी उपक्रम यंदाच्या रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये ओरोस येथील प्रक्षेत्रावर राबविला. महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांद्वारे एकूण २० एकर प्रक्षेत्रावर नैसर्गिक शेती केली आहे.
कृषी महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष, ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या या उपक्रमामध्ये कृषी महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षातील ९० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. लागवडीपासून काढणीपर्यंत सर्व प्रात्यक्षिकांचा प्रत्यक्ष श्रमातून अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. नैसर्गिक पद्धतीने सर्व प्रक्षेत्रावर भाजीपाला लागवड, भुईमूग बीजोत्पादन, कडधान्य लागवड, कलिंगड लागवड व झेंडू लागवड आदी पिकांची यशस्वीपणे लागवड केली आहे.
शेतीमध्ये दिवसेंदिवस भरमसाट खर्च वाढत आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतात. रासायनिक शेती पद्धतीमुळे शेतीतील खर्च वाढण्यासह जैवविविधतेलाही बाधा येते. सध्याचा विचार करता रासायनिक अवशेषमुक्त अन्नाची मोठी गरज निर्माण झाली आहे. सुदृढ आरोग्यासाठी दर्जेदार अन्ननिर्मिती होणे, शेतीसाठी खर्च कमी करणे व जैवविविधतेचे संवर्धन करणे यासाठी नैसर्गिक शेती हा एक उत्तम पर्याय आहे. ब्रिगेडियर सावंत हे नैसर्गिक शेतीची चळवळ देशभर राबवित आहेत. त्यांनी हा उपक्रम देशपातळीवर राबविण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला व तो मंजूर करून घेतला. त्यांनी स्थापन केलेल्या कृषी महाविद्यालय व कृषी विज्ञान केंद्रामध्ये गेली सहा वर्षे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील शेतकऱ्यांच्या शेतावर नैसर्गिक शेतीचे तंत्रज्ञान पोहोचविण्याचे कार्य करीत आहेत. कृषी विज्ञान केंद्र किर्लोस नैसर्गिक शेतीच्या प्रसारामध्ये अग्रगण्य संस्था म्हणून काम करत आहे.
दरम्यान, या केंद्राद्वारे सर्व विद्यार्थ्यांना नैसर्गिक निविष्ठा तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. चिंचवली येथील नैसर्गिक शेतीच्या तज्ज्ञ शेतकरी प्रतीक्षा भालेकर यांनी प्रक्षेत्रावर विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत यांनी नैसर्गिक शेतीच्या लागवडीची पाहणी करून समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. योगेश पेडणेकर, सर्व प्राध्यापक व कर्मचारी, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ व चतुर्थ वर्ष कृषीच्या सर्व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले, अशी माहिती कृषी महाविद्यालयाचे प्रा. योगेश पेडणेकर यांनी दिली.
--
कृषी विज्ञान केंद्रातर्फे मार्गदर्शन
नैसर्गिक शेतीचे वैशिष्ट्य म्हणजे, रासायनिक खत व कीटकनाशके न वापरता प्रक्षेत्रावरीलच साधनसामग्रीचा वापर करून शेती करणे. यामध्ये देशी गाईचे शेण व गोमूत्र याचा वापर करून जीवामृत, बीजामृत, घनजीवामृत तयार करणे, प्रक्षेत्रावरील वनस्पतीच्या पाल्याचा वापर करून दशपर्णी अर्क, निमास्त्र, अग्निअस्त्र अशा प्रकारची नैसर्गिक कीटकनाशके शेतावरच तयार करून ती वापरणे, देशी बियाण्यांची लागवड व संवर्धन करणे आदींचा समावेश होतो. नैसर्गिक शेतीमधील वेगवेगळ्या प्रयोगांमधून मातीच्या जडणघडणीमध्ये व जिवंतपणामध्ये आमुलाग्र बदल घडून येत आहेत. मातीमधील सूक्ष्मजीव जंतू व गांडुळाच्या संख्येमध्ये वाढ होऊन ह्युमसच्या प्रमाणामध्ये वाढ होत आहे. हा प्रकल्प राबविण्यासाठी किर्लोस कृषी विज्ञान केंद्राद्वारे सर्व तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com